श्रीनगर : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना अगदी देशाच्या सीमेनजीक असणाऱ्या जम्मू-काश्मीर येथील उरी येथेही हा हा उत्साह पाहायला मिळत आहे. नेहमी शस्त्रसंधी, सैन्यदल, दहशतवादी कारवाया, चकमक याविषयीच्याच बातम्या ज्या भागातून येतात, त्याच भागात आज भक्तीचा साज चढला आहे. निमित्त आहे ते म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्वाचं.
उरी येथे तब्बल २ हजार वर्षांपूर्वीच्या शिव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने खास पूजेचं आयोजन केलं गेलं. बीएसएफच्या सुरक्षा कवचात असणारं हे मंदिर एका अर्थी अनेकांसाठी आशेचा किरण आहे, तर कोणासाठी शांततेचं प्रतिक आहे. हे मंदिर दाता मंदिर या नावानेही ओळखलं जातं. अनेक पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे मंदिरांचा उल्लेख असतो, त्याचप्रमाणे या मंदिराच्या रचनेत पांडवांचं योगदान असल्याचं म्हटलं जातं.
बीएसएफ अधिकाऱ्यांनी झी मीडियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार या मंदिराची बांधणी ही एका रात्रीत करण्यात आली होती. मंदिरातील शिवलिंगावर थेट झेलम नदीच्याच पाण्याने अभिषेक व्हायचा असंही म्हटलं जातं. दहशतवादी हल्ला, तणावाचं वातावरण किंवा मग कोणतंही संकट. दाता मंदिरातील पूजा कधीची चुकत नाही.
मंदिराच्या पुजारी असणाऱ्या गिरीजा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या संरक्षणामुळे मंदिराला आणि भाविकांना कधीही कोणत्याच संकटांचा सामना कराला लागलेला नाही. हे मंदिर म्हणजे हिंदू- मुस्लिम ऐक्याचं प्रतिक आहे असंही त्या म्हणाल्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तर, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. हे मंदिर म्हणजे धगधगत्या, वातावरणातही श्रद्धेच्या बळावर भक्कमपणे उभं असणारं सलोखा आणि आणि एकोप्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे खरं.