Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील जामताडा आणि विद्यासागर या स्टेशनदरम्यान रेल्वेचा हा भीषण अपघात घडला. भागलपूरच्या दिशेने जाणाऱ्या अंग एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली होती. त्यामुळे रेल्वे ड्रायव्हरने ब्रेक मारुन गाडी थांबवली. यादरम्यान अंग एक्सप्रेसमध्ये घाबरलेल्या काही प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू रेल्वे गाड्यांमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. याचवेळी बाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन झाझा-आसनसोल ही रेल्वे जात होती. या गाडीचा वेग प्रचंड होता. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर उडी मारलेले प्रवासी या गाडीच्या खाली चिरडले गेले.
या घटनेत जवळपास 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांची ओळख पटली आहे. यातील एकाचे नाव सिंकदर कुमार असून तो बिहारमधील जमुई या ठिकाणचा रहिवाशी आहे. तर मनीष कुमार असे दुसऱ्याचे नाव असून तो बिहारच्या कटिहारमधील रहिवाशी आहे. या घटनेत अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे.
रेल्वेच्या या भीषण अपघातानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासन, अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पण काळोख असल्याने बचावकार्यात अडथळे येत असल्याचे बोललं जात आहे. तसेच या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
जामताडामधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काला झरिया या परिसरातील काला झरिया रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. यात अनेक प्रवाशी रेल्वेखाली चिरडले गेले. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण अद्याप मृतांची संख्या समोर आलेली नाही. अनेक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.