EXIT POLL: झारखंडमध्ये भाजपला पराभवाचा धक्का; जेएमएम-काँग्रेसकडे सत्ता?

बहुतांश एक्झिट पोल्सनी झारखंडमध्ये भाजपचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविले आहे. 

Updated: Dec 21, 2019, 07:50 AM IST
EXIT POLL: झारखंडमध्ये भाजपला पराभवाचा धक्का; जेएमएम-काँग्रेसकडे सत्ता? title=

नवी दिल्ली: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे ( EXIT POLL) निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरले. बहुतांश एक्झिट पोल्सनी झारखंडमध्ये भाजपचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविले आहे. तर काँग्रेस-जेएमएम आघाडी बहुमत मिळवून सत्तेत येईल, असा या एक्झिट पोल्सचा होरा आहे. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झाले होते. अखेरच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. येत्या २३ तारखेला झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

मात्र, त्यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सची आकडेवारी भाजपसाठी निराशादायक ठरली. २०१४ च्या निवडणुकीत झारखंडमध्ये भाजप ३७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर जेएमएमला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, यंदा भाजपला जवळपास ३७ जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. 

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने कलम ३७० आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून प्रचार केला होता. मात्र, निवडणूक शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला होता. याउलट विरोधकांनी बेरोजगारी, पाण्याची समस्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आदी मुद्द्यांवर प्रचारावेळी भर दिला होता. एक्झिट पोल्सचे एकूण निकाल पाहता भाजपचा हा प्रचार सपशेल फेल ठरलेला दिसत आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार जेएमएम-काँग्रेस आघाडीला झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल. ८१ जागांपैकी जेएमएम-काँग्रेस आघाडीला ४४ जागा मिळणार असून भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतरांना ९ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ANS-CVoter-ABPच्या एक्झिट पोलनुसार भाजपला यंदा २८ ते ३६ जागा मिळतील. तर जेएमएम-काँग्रेस आघाडीच्या पारड्यात ३१ ते ३९ पडतील. त्यामुळे अपक्षांची मदत घेऊन जेएमएम-काँग्रेस आघाडी बहुमताचा ४१ चा आकडा सहज पार करेल, अशी शक्यता आहे. 

'आज तक'च्या अंदाजानुसार झारखंडमध्ये JMM-Congress आघाडीला ३८ ते ५० जागांवर विजय मिळेल. तर भाजपला २२ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय, जेव्हीएम २-४, तर एजेएसयू ३-५ आणि अपक्षांना ४ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार जेएमएम आघाडीला ३८ ते ५० जागा मिळतील. तर भाजपला केवळ २२ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागेल.

एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत भाजपला २२ ते ३२ जागाच जिंकता येतील. तर जेएमएम आघाडी ३८ ते ५० जागा जिंकून सत्तेत येईल.