...तर नोकरी गेल्यानंतरही मिळणार वेतन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

Updated: Nov 25, 2019, 01:41 PM IST
...तर नोकरी गेल्यानंतरही मिळणार वेतन title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : नोकरदार वर्गाला आपली नोकरी सुरक्षित ठेवणं कठिण होतं. कर्मचाऱ्यांना अनेकदा कॉन्ट्रॅक्टवर कामासाठी घेतलं जातं आणि कोणत्याही नोटिसशिवाय, किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर नोकरीवरुन काढून टाकलं जातं. कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या कर्मचाऱ्यासमोर अचानक गेलेल्या नोकरीमुळे किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे मोठं संकट उभं ठाकतं. परंतु आता अशाप्रकारे नोकरी गेल्यास मोदी सरकार कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. हे पैसे २४ महिने म्हणजेच २ वर्षांपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. व्यक्ती बेरोजगार झाल्यापासून दुसरी नोकरी मिळेपर्यंतच्या दरम्यान पैसे खात्यात जमा होणार आहेत.

केंद्र सरकारने राज्य कर्मचारी विमा योजना (ESIC) 'अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना'अंतर्गत सरकार नोकरी जाणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करणार आहे. याबाबत ईएसआयसीने (ESIC)ट्विट करत माहिती दिली आहे. सरकारच्या या नव्या योजनेअंतर्गत नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येण्याचं राज्य कर्मचारी विमा योजनेकडून सांगण्यात आलं आहे.

कसा घ्याल योजनेचा फायदा -

कोणत्याही नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्याला, अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्याला ESICच्या वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरुन ESICच्या ब्रँचमध्ये जमा करावा लागेल. या फॉर्मसह २० रुपयांच्या नॉन-ज्युडिशियल पेपरवर नोटरीद्वारे एफिडेविड करावं लागेल.

या फॉर्मची अनेक भागात विभागणी करण्यात आली आहे. यात AB-1 पासून  AB-4 पर्यंतचे फॉर्म आहेत. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करुन ऑफिसमध्ये जमा करावी लागेल. अद्याप यासाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी www.esic.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

या योजनेचा फायदा केवळ एक वेळाच घेता येऊ शकतो. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्याने कामाच्या ठिकाणी कमीत-कमी दोन वर्षे पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. नोकरी गेल्यानंतर मिळणारं वेतन हे मुळ पगाराच्या २५ टक्के मिळू शकेल.