Salary News : सध्या नोकरदार वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे अनेकांच्याच खात्यात आलेला दिवाळी बोनस. सोप्या शब्दांत सांगावं तर जास्तीचा पगार. सणासुदीच्या दिवसांमध्ये खात्यात आलेली ही रक्कम अनेकांनाच मोठा दिलासा देऊन जात आहे. तुम्हीही त्यातलेच आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी. कारण ही बातमी आहे आगामी पगारवाढीसंदर्भातली अर्थात पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या Appraisals संदर्भातली.
नव्या वर्षाचा पहिला महिना उलटल्यानंतर अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे वार्षिक पगारवाढीचे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून अनेक कंपन्यांमध्ये यासंदर्भातील प्रक्रिया सुरु होते. ज्यानंतर महिन्याभराच्या फरकानं कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची वाढीव रक्कम जमा होते. भारतात पुढील वर्षी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे.
विलिस टॉवर वॉटसनच्या एका अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सर्व खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना सरासरी 9.8 टक्क्यांनी पगारवाढ देऊ शकतात. एकिकडे ही समाधानकारक वेतनवाढीची चर्चा असतानाच दुसरीकडे 'सॅलरी बजेट प्लॅनिंग इंडिया'च्या अहवालानुसार अद्यापही सर्व क्षेत्रांतील कंपन्यांकडून त्यांच्या उत्पादन खर्चावर लक्ष केंद्रीत केलं जात असल्यामुळं पगारवाढीबाबत साशंकता आहे. 2023 मध्ये हे सरासरी प्रमाण 10 टक्क्यांवर होतं, 2024 मध्ये मात्र ते 9.8 टक्केच राहील असा तर्क या अहवालातून लावण्यात आला.
नव्या वर्षामध्ये वस्तू, उत्पादन, औषध निर्माण, माध्यम आणि गेमिंग या क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होऊ शकतो. आयटी क्षेत्रात मात्र याउलट चित्र पाहायला मिळू शकतं. असं असलं तरीही इतर क्षेत्रांच्या तुलनेत ही पगारवाढ 2 ते 3 टक्क्यांनी जास्त असेल हेसुद्धा नाकारता येत नाही.