नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दु कवी मुनव्वर राणा यांनी, अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने न्याय मिळाला नाही, असं म्हटलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारणं सक्तीचं आहे आणि तो स्वीकारत आहे, परंतु न्याय मिळाला नाही, सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयाने नाराज असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
राम मंदिर भूमिपूजनासाठी पंतप्रधानांनी यायला नको होतं, मुस्लीमांनाही यात सहभागी करुन घ्यायला हवं होतं, असं त्यांनी म्हटलंय. आपण एक शायर, कवी असून याच नजरेतूनच अयोध्या पाहिली आहे. बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर, ज्या न्यायाची अपेक्षा होती, तो न्याय मिळाला नसल्याचं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी पत्रातून काही मागण्या केल्या आहेत. अयोध्येत देण्यात आलेल्या जमिनीवर राजा दशरथाच्या नावे एक रुग्णालयं उभारावं, तसंच शिया आणि सुन्नी बोर्डसारख्या संस्था बंद कराव्यात. या संस्था मुस्लिमांचं नेतृत्व करत नाहीत. अशा परिस्थितीत देवबंद किंवा इतर मुस्लिम मदारांशी मशिदीबद्दल बोललं पाहिजे, त्याशिवाय बाबरी मस्जिद रायबरेलीमध्ये उभारली जावी, असं त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं.
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. यावेळी 175 साधू-संतांना भूमिपूजनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.