आई वडिलांची हत्या करुन जंगलात जाऊन लपला मुलगा; पोलिसांनी अशी केली अटक

Karnataka Crime : कर्नाटकात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने सर्वानाच हादरवून सोडलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. भावाच्याच तक्रारीनंतर पोलिसांनी  मुलाला जंगलातून अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 02:11 PM IST
आई वडिलांची हत्या करुन जंगलात जाऊन लपला मुलगा; पोलिसांनी अशी केली अटक title=

Karnataka Crime : कर्नाटकातील (Karnataka News) बंगळुरू येथून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात घर बांधण्यासाठी दिलेले 15 लाख रुपये परत करण्यास नकार दिल्याने एकुलत्या एका मुलाने आई वडिलांची हत्या केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) याप्रकरणी 27 वर्षीय मुलाला वृद्ध आई-वडिलांच्या दुहेरी माडीकेरी जंगलात (Madikeri forest) तीन दिवसांच्या शोधानंतर ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मुलाने हे कृत्य लपवण्यासाठी खुनाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कुटूंबियांच्या विनंतीवरून खुनी मुलाला नैराश्यातून उपचारासाठी निम्हण येथे दाखल करण्यात आले आहे.

आई वडिलांचा हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला होता. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा गुरुवारी संध्याकाळी मडिकेरी जंगल परिसरात जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली आणि जंगलातून अटक केली. हत्येच्या रात्री तो बंगळुरू येथील आपल्या घरातून मडिकेरीच्या जंगलात निघून गेला होता.

शरथ सुरवर्ण असे आरोपीचे नाव असून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कर्नाटकात जाण्यासाठी बसमध्ये चढण्यापूर्वी शरथ सुवर्णा हा बंगळुरूभोवतीच सुमारे 40 किलोमीटर फिरत होता. तो बसने पुत्तूर येथे उतरून मडिकेरीला पोहोचला होता. तेथे त्याने जंगलात प्रवेश केला. त्याला जळूने चावल्यानंतरही तो तिथेच थांबून होता. स्थानिक लोकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.

18 जुलै रोजी शरथ सुरवर्ण हा वृद्ध आई-वडिलांचा मृतदेह सापडण्याच्या काही तास आधीच बंगळुरूमधील कोडिगेहल्लीच्या घरातून बेपत्ता झाला होता. शेजारीच राहणारा शरथचा भाऊ साजित सुरवर्ण हा आपल्या आई-वडिलांशी भेटण्यासाठी घरी गेला होता. साजित सुरवर्ण याला घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. साजितला टेरेसवरील शरथच्या खोलीलाही कुलूप लावलेले दिसले. त्यानंतर साजितने कसातरी घरात प्रवेश केला. साजितला घरात त्याचे 61 वर्षीय वडील भास्कर सुरवर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तर सजितची आई शांता सुरवर्ण (60) या सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पडला होता. दोघांच्या डोक्यावर हत्याराने वार केल्याचे दिसत होते.

हा सर्व प्रकार पाहून साजितने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शरथच्या नावे पोलिसांत तक्रार दाखल केली. बेरोजगार शरथ हा टेरेसवर एकटाच राहत होता. त्याने आई वडिलांसह कोणीच वर येऊ नये अशी धमकी दिली होती. वृद्ध जोडप्याची हत्या उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. शरथ सुरवर्णने यापूर्वीही त्याच्या आई-वडिलांना मारहाण केली होती. पण या घटनेमागे त्याचा नेमका हेतू काय होता हे आम्हाला माहीत नाही, असे शेजारच्यांनी सांगितले.