कर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता

कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

Updated: May 16, 2018, 04:17 PM IST
कर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता  title=
File Photo

बंगळुरु : कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

यापूर्वी वृत्त समोर आलं होतं की, काँग्रेस पक्षाचे ४ ते ६ आमदार बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. इतकचं नाही तर, काँग्रेस आमदारांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याचंही समोर आलं आहे. याच रिसॉर्टमध्ये २०१७ च्या राज्यसभा निवडणुकी दरम्यान गुजरातच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं.

काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया

पक्षाचा आमदार बेपत्ता असल्याच्या वृत्तावर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रिया देत म्हटलं की, आमदार बेपत्ता नाहीये तर त्याच्यासोबत संपर्क होऊ शकत नाहीये. तसेच त्याच्यासोबत लवकरच संपर्क होईल. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ७८ आमदार विजयी झाले आहेत तर, जेडीएसचे ३८ आमदार आहेत. १०४ आमदारांसह भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.

काँग्रेस आमदाराने केला दावा

काँग्रेसचे आमदार टीडी राजेगौडा यांनी दावा केला आहे की, भाजपतर्फे मला सलग फोन कॉल्स येत आहेत मात्र मला कुठलीच चिंता नाहीये. मी त्यांना फोन न करण्यास सांगितलं आहे. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. तर, जेडीएस नेता कुमारस्वामी यांनी भाजपचे कर्नाटक इनचार्ज प्रकाश जावडेकर यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे.