महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडी मात्र फक्त 50 जागांवरच विजय मिळवू शकली. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 20 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त 10 जागा जिंकली. दरम्यान विजय इतक्या मोठ्या फरकाने झाले आहेत की, तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
निवडणुकीला सामोरे गेलेल्या 4136 पैकी 3515 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. म्हणजेच तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामुळे निवडणूक आयोगाकडे एकूण 3.5 कोटींचं डिपॉझिट जमा झालं आहे. एकूण वैध मतांपैकी 1/6 (एक षष्टमांश) पेक्षा कमी मतं मिळणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं. प्रत्येक उमेदवाराला 10 हजारांचं डिपॉझिट भरणं अनिवार्य असतं. तर अनुसुचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी हे डिपॉझिट 5 हजार रुपये इतकं असतं.
महाविकास आघाडीच्या एकूण एकूण 22 उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. काँग्रेसच्या 9, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 तर शेकापच्या 2 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामध्ये मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
यामध्ये महायुतीमधील पक्षांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदेंच्याही एका उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असून, अजित पवांरांच्या 5 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली.