मरिना बीचवरच करुणानिधींवर अंत्यसंस्कार, हायकोर्टाने याचिका फेटाळली

करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद 

Updated: Aug 8, 2018, 09:05 AM IST
मरिना बीचवरच करुणानिधींवर अंत्यसंस्कार, हायकोर्टाने याचिका फेटाळली title=

चेन्नई : डीएमके पक्षाचे नेते करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद निर्माण झाला आहे. करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार होणार की नाही, यासंदर्भात मद्रास हायकोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारने युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितला होता. करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता.

सरकारने गांधीमंडपम येथील दोन एकर जागा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, करुणानिधी यांच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी या जागेस नकार दिला. शेवटी या प्रकरणी डीएमकेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.