मुंबई: केरळमधील पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात नौदलातील लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड यांचं साहस चर्चेचा विषय आहे. चक्क छतावर हेलिकॉप्टर उतरवून त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवलेत. कुटुंबातूनच वैमानिकाचा वारसा लाभलेल्या अभिजीत यांची केरळमधील 'गरुड' भरारी कौतुकास्पद आहे. अभिजीत यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना बचाव मोहिमेची सविस्तर माहिती दिली. .
७ ऑगस्ट... चालाकुडी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. हेलिकॉप्टर हेच बचावाचं एकमेव साधन राहिलं होतं... नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर घेऊन या गावात बचावकार्याला सुरूवात केली... वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरूड सारथ्य करत असलेल्या नेव्हीच्या बी ४२ या हेलिकॉप्टरच्या चमूला पूरग्रस्त भागात जेमिनी बोटी टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आठ बोटी पाण्यात टाकल्यावर हेलिकॉप्टर चमूने इतरांना एअरलिफ्ट करायला सुरूवात केली. त्याचवेळी त्यांनी एका घराच्या गच्चीत काही वृद्ध माणसं दिसली. त्यातल्या चौघांना एअरलिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर उरलेल्या २२ जणांना घेण्यासाठी आणखी खाली उतरण्याचा निर्णय घेण्यात आला... या २२ जणातल्या उरलेल्यांना उचलण्यासाठी हेलिकॉप्टर अखेर घराच्या गच्चीवर अतिशय जवळ तब्बल ८ मिनिटं नेण्यात आलं. मात्र एका क्षणी हे हेलिकॉप्टर गच्चीला अक्षरशः टेकवलं होतं... कोणत्याही वैमानिकासाठी हा सर्वात कठीण क्षण... लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरूड यांनी हे आव्हान पेललं.... हेलिकॉप्टर अवघ्या ३ सेकंदांसाठी त्यांनी गच्चीवर टेकवलं आणि चमूने तेवढ्या काळात उरलेल्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेतलं.
चाकांवर भार देऊन हेलिकॉप्टर गच्चीत उतरवणं गरजेचं होतं... गच्चीवर भार दिला असता तर गच्ची कोसळली असती. हेलिकॉप्टरचे तुकडे तुकडे होण्यासाठी अवघे तीन ते चार सेकंदही पुरले असते. हा खूप कठीण कॉल होता. पण मी तो घेतला याचा मला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरूड यांनी दिली. वैमानिकाचा योग्य अंदाज, आणि अचूक हवाई निर्णय क्षमतेचं हे उदाहरण मानलं जातंय. लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरूड, सहवैमानिक लेफ्टनंट कमांडर रजनीश, नॅव्हीगेटर लेफ्टनंट सत्यरथ, विंच ऑपरेटर अजित आणि फ्री डायव्हर राजन यांनी जीव धोक्यात घालून हे मिशन यशस्वी करत २६ जणांचे प्राण काही सेकंदात वाचवले... कोणत्याही भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशीच ही कामगिरी.