केरळाच्या मंदिरात देवाला 'ही' फुलं वाहण्यास बंदी, दुर्देवी घटनेनंतर घेण्यात आला मोठा निर्णय

केरळात मंदिरांमध्ये एक विशिष्ठ फूल देवाला वाहण्यास किंवा प्रसाद म्हणून भाविकांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. अडीच हजार मंदिरांचं नियोजन करणाऱ्या न्यासाने हा निर्णय घेतला आहे. या फुलाची पानं खाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला होता.

राजीव कासले | Updated: May 14, 2024, 04:44 PM IST
केरळाच्या मंदिरात देवाला 'ही' फुलं वाहण्यास बंदी, दुर्देवी घटनेनंतर घेण्यात आला मोठा निर्णय title=

केरळात (Kerala) 2500 हजार मंदिराचं नियोजन करणाऱ्या न्यासाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या  मंदिरांमध्ये एक विशिष्ठ फूल देवाला वाहण्यास किंवा प्रसाद म्हणून भाविकांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही फुलं विषारी असल्याचं आढळून आलं आहे. एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर न्यासाने तातडीने या फुलांवर बंदी घातली आहे. ओलिंडर प्रजातीची फुलं (Oleander Flowers) म्हणजे कण्हेरच्या फुलांवर बंदी घालण्यात आली आहे.

फुलांवर का घालण्यात आली बंदी
24 वर्षांची तरुणी सूर्या सुरेंद्र हिच्या मृत्यूनंतर न्यासाने फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेंद्रन नोकरीनिमित्ताने लंडनला जाणार होती. तिच्या घरात कण्हेरच्या फुलांचं रोपटं होतं. जाण्यापूर्वी  तीने कण्हेरच्या झाडांची काही पानं खाल्ली आणि त्यानंतर ती विमानतळावर जाण्यासाठी निघाली. पण विमानतळावर तिला अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे नातेवाईकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सूर्या सुरेंद्रनच्या शरीरात विषारी द्रव्य आढळली. कण्हेरची पानं खाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनही (PM Report) समोर आलं.

मंदिर न्यासाने घेतला निर्णय
सूर्या सुरेंद्रनच्या मृत्यूनंतर खबरदारीचा उपाय म्हणून केरळातील सर्व मंदिरात या फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. केरळासहीत देशातील अनेक मंदिरांमध्ये देवाला कण्हेरची फुलं वाहिली जातात. भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादातही या फुलांचा समावेश करु नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

कण्हेरीचं फूल म्हणजे काय?
कण्हेर म्हणजे ओलिंडरचे पूर्ण नाव नेरियम ओलेंडर आहे, याला रोझबे असंही म्हणतात. उष्णकटिबंधीय प्रदेशात उगवणाऱ्या या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते दुष्काळातही लवकर कोमेजत नाही. या गुणवत्तेमुळे, ते लँडस्केप सौंदर्यासाठी देखील वापरलं  जातं. केरळात महामार्ग आणि समुद्रकिनाऱ्यांजवळ कण्हेर म्हणजे ओलिंडरची भरपूर झाडं आहेत.ही फुलं दिसायला सुंदर आणि पाण्याशिवाय बराच काळ जगू शकतात. उत्तर भारतात या फुलांना कण्हेर म्हणतात, तर केरळात अरली किंवा कणवीरम असं नाव आहे. या फुलाचे अनेक प्रकार आहे. प्रत्येक जातीच्या फुलाचा रंग आणि सुंगध वेगळा आहे. ही फुलं पिवळ्या, गुलाबी आणि पांढऱ्या रंगात आढळतात.

कण्हेरच्या फुलांचा वापर औषधांसाठीही केला जातो. या झाडांचं मूळ आणि सालीच्या तेलाचा त्वचेच्या आजारांसाठी उपचार म्हणून केला जातो. पण या झाडाची पानं काही प्रमाणात विषारी असल्याचंही वैद्यकीय क्षेत्रात सांगण्यात आलं आहे. या झाडाची पानं खाल्याने उलटी, जुलाब सारखी लक्षणं दिसतात. अनेकवेळा शरीरावर लाल डागही उमटतात. ह्यदयाचे ठोके अनियमित होतात.