मोठी बातमी: उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर दोषी

कुलदीप सिंह सेंगर दोषी 

Updated: Dec 16, 2019, 03:37 PM IST
मोठी बातमी: उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर दोषी title=
फोटो सौजन्य : एएनआय

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी कुलदीप सेंगर दोषी असल्याचा निकाल दिला. तर या खटल्यातील सहआरोपी शशी सिंह याची निर्दोष सुटका करण्यात आली. आता येत्या १९ तारखेला कुलदीप सेंगरला शिक्षा सुनावण्यात येईल.

सुरुवातीला हा खटला लखनऊमध्ये चालवण्यात येत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा खटला दिल्लीत वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरु झाली होती. गेल्या आठवड्यात या खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा निकाल राखून ठेवला होता. कुलदीप सेंगर याच्यावर तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा आरोप होता. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.

४ जून २०१७ मध्ये उन्नाव पीडितेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरसह आणखी एक आरोपी शशी सिंहवरही आरोप लावण्यात आले होते. मात्र न्यायालयाकडून शशी सिंहला निर्दोष मुक्त करणण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात ५ एफआयआर दाखल करण्यात आले होते. पीडितेवर सामुहिक बलात्कार केल्याची दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर तिसरी एफआयआर पीडितेच्या वडिलांना मारहाण आणि त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांच्या मृत्यू झाल्याबाबत दाखल करण्यात आली होती.

त्याशिवाय पाचवी एफआयआर यावर्षी २८ जुलै रोजी साक्ष देण्यासाठी पीडिता अलाहबाद कोर्टात जात असताना रायबरेलीमध्ये तिचा अपघात झाला होता. या अपघातात पीडितेच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. अपघातात पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते.