नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी 7 खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या खेळाडूंमध्ये कर्नाटकच्या केवाय वेंकटेश (पॅरा स्पोर्ट्समन) यांचे ही नाव होते. केवाय व्यंकटेश (KY Venkatesh) कोण आहेत, ज्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी प्रोटोकॉलला बगल देत मंचावरून खाली उतरून पद्मश्री पुरस्काराने (Padmashree Award) त्यांचा गौरव केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी पॅरा-अॅथलीट केवाय व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. वेंकटेश यांनी 1994 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, जेव्हा त्यांनी जर्मनीमध्ये झालेल्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यासह, 2009 मध्ये पाचव्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्या वर्षी देशाने 17 पदके जिंकली. खेळात आणि त्याच्या विकासातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यंकटेश (44) हे मूळचे कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत. त्यांची उंची चार फूट दोन इंच आहे.
मंचावरून खाली उतरून राष्ट्रपतींनी केला सन्मान
यादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या साधेपणानेही लोकांची मने जिंकली. राष्ट्रपतींनी पॅरा-अॅथलीट केवाय व्यंकटेशचा मंचावरून खाली उतरून गौरव केला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद 4 फूट 2 इंच पॅरा-अॅथलीट आणि लिम्का रेकॉर्ड धारक केवाय वेंकटेश यांना पद्मश्री बहाल करण्यासाठी पायऱ्या उतरून आले. केवाय व्यंकटेशने 2005 मध्ये चौथ्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सहा पदके जिंकून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नाव नोंदवलं.
Here's the clip pic.twitter.com/5Z6VHlFIZJ
— कालक्रम (@kaalakram) November 9, 2021
पद्मश्री पॅरा अॅथलीट व्यंकटेश यांना अॅकॉन्ड्रोप्लासिया नावाचा शारीरिक विकासात अडथळा आणणारा आजार आहे, जो हाडांच्या विकासाचा विकार आहे. या आजारामुळे त्यांच्या शरीराची वाढ 4 फूट 2 इंचांवर थांबली होती, मात्र या आजाराला बळी न पडता आयुष्याला नवे वळण देत त्यांनी पॅरा अॅथलीट क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार केला.
2005 च्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल वेंकटेश यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले तेव्हा देशाला अभिमान वाटला. खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि अॅथलेटिक्समध्ये पदके जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. पॅरालिम्पिकप्रमाणेच वर्ल्ड ड्वार्फ गेम्स दर चार वर्षांनी एकदा आयोजित केले जातात. केवाय व्यंकटेश यांनी 1994 मध्ये बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता निवृत्त झाले असून, ते कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव म्हणून काम करतात.