जम्मूत भूस्खलनामुळे सलग पाचव्या दिवशीही महामार्ग बंद

सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ते दुरूस्तीच्या कामात अडथळा

Updated: Feb 10, 2019, 04:14 PM IST
जम्मूत भूस्खलनामुळे सलग पाचव्या दिवशीही महामार्ग बंद  title=

श्रीनगर : काश्मीरला जोडणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग रविवारी सलग पाचव्या दिवशीही बंद आहे. जम्मूतील अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ते दुरूस्तीच्या कामात वारंवार अडथळा निर्माण होत आहे. भूस्खलनामुळे जमा झालेले ढिगारे उचलल्यानंतर महामार्गांवरील वाहतूक सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्तर भारतात सतत बर्फवृष्टी होत आहे. जोरदार हिमवर्षाव आणि मुसळधार पावसानंतर बुधवारी महामार्गावरील वाहतूर पूर्णत: बंद करण्यात आली होती. हिमवर्षाव आणि पावसामुळे जवाहर सुरंग, काजीगुंड-बनिहल-रामबन येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. हिमपर्वतांमधून मोठा बर्फ पडत असल्याने सफाई अभियानांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

बुधवारपासून बंद महामार्ग बंद असल्याने भारतीय वायु सेनेने 'सी१७ ग्लोबमास्टर'ची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, जम्मूतील तापमानाचा पारा काही अंशी वाढला असून हिमवर्षाव होत असलेल्या ठिकाणी तापमानाचा पारा शून्य अंशाच्या खाली गेला आहे.