मुंबई : साधारण मागील वर्षअखेरी चीनच्या वुहान शहरामध्ये coronavirus कोरोना व्हायरसनं डोकं वर काढलं. पाहता पाहता चीनला विळख्या घेणाऱ्या या विषाणूचा संपूर्ण जगभरात झपाट्यानं फैलाव झाला. अतिशय वेगानं साऱ्या जगभरात पसरणाऱ्या या व्हायरची दहशत आणि त्याचे गंभीर परिणाम पाहता जवळपास संपूर्ण जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. विविध राष्ट्रांनी त्यांच्या परिनं या लॉकडाऊनचं पालन केलं.
भारतात मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचं विविध टप्प्यांमध्ये पालन केलं जात आहे. या काळात विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून अनेक व्यवहार ठप्प झाले. कालांतरानं काही प्रमाणात शिथिलचा मिळाल्यानंतर बहुतांश व्यवहारांना चालना मिळाली. एकिकडे लॉकडाऊनमुळं आयुष्याचा वेग मंदावत असताना दुसरीकडं वर्क फ्रॉम होम आणि आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अनेक स्तरांत अवलंब केला जात असल्यामुळं लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग क्विंटच्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये चीनमधून येणाऱ्या विद्युत उपकरणांच्या आयातीत कमालीची घट झाली. पण, आशिया खंडातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतात मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून लॅपटॉप, डेस्कटॉपच्या विक्रीत वाढ झाली आहे.
जगातील राष्ट्रांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भारत हा सर्वाधिक काळासाठी लॉकडाऊन लागू करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत येतो. जेथे ऑनलाईन खरेदी- विक्रीलाही बंदी आली होती. पण, टाळेबंदीमध्ये शिथिलता आणल्यानंतर मात्र ग्राहकांनी परिस्थितीनुरुप आवश्यक त्या वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळालं.
जवळपास २ ते ३ टक्क्यांनी बाजारात लॅपटॉप, टॅबच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात घरुनच काम करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. शिवाय ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत आता शालेय वर्षांचीही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं या उपकरणांच्या खरेदीला सातत्यानं प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.