प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत तयार; ट्रान्सफॉर्म-परफॉर्मवर विश्वास - पंतप्रधान मोदी

हा भारत ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्मवर विश्वास ठेवणारा भारत आहे.

Updated: Jul 9, 2020, 07:49 PM IST
प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत तयार; ट्रान्सफॉर्म-परफॉर्मवर विश्वास - पंतप्रधान मोदी
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया ग्लोबल वीक 2020 उद्घाटनावेळी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी सांगितलं की, कोरोनाचं संकट आणि अर्थव्यवस्थेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. इंडिया ग्लोबल वीक 2020 मध्ये 30 देशांतील 5000 लोक भाग घेतील. तसंच इंडिया ग्लोबल वीक 2020 मध्ये 250 ग्लोबल स्पीकर्स 75 सत्रं आयोजित करतील.

इंडिया ग्‍लोबल वीक 2020 या तीन दिवसीय संम्मेलनाचा विषय Be the Revival: India and a better new world हा आहे. यावेळी बोलताना मोदींनी सांगितलं की, 'पुनरुज्जीवनाबद्दल बोलणं, जागतिक पुनरुज्जीवन आणि भारत यांना जोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ग्लोबल रिव्हाइवल अर्थात पुनरुज्जीवनामध्ये भारत अग्रणी भूमिका साकारेल. सामाजिक किंवा आर्थिक अशी कोणतीही समस्या असली तरी भारताने नेहमीच पुढे येऊन काम केलं आहे. आज भारत कोरोनाविरोधी लढाई लढत असतानाच आपण अर्थव्यवस्थेकडेही लक्ष ठेवत आहोत. जागतिक प्रगतीसाठी भारत अनेक पावलं उचलण्यास तयार आहे. हा भारत ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्मवर विश्वास ठेवणारा भारत आहे.'

'सरकारने गेल्या सहा वर्षात अनेक असे निर्णय घेतले, ज्यामुळे पुढील मार्ग सुकर होईल. GSTसह अनेक मोठे निर्णय याचं उदाहरण आहे. कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. मदत पॅकेजची घोषणा केली, ज्याद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे टाकले जात आहेत. गरिबांना जेवण देण्यात येत आहे. अनलॉक काळात मजूरांना रोजगार देण्याचं कामही करण्यात येत आहे. यामुळे रोजगार मिळण्यासह गावात पायाभूत सुविधाही निर्माण होतील' असं मोदी म्हणाले.

इंडिया ग्लोबल वीक 2020मध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, भारतात तयार होणाऱ्या औषधांमुळे, जगाच्या गरजा भागवल्या जात आहेत. देशात कोरोनावरील लस तयार करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. आज संपूर्ण देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वेगात पुढे जात असल्याचा, विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.