भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण

आता सतर्कतेची पावलं आणखीन कठोर झाल्याचं पाहायला मिळत आहे

Updated: Mar 18, 2020, 07:15 AM IST
भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या संख्येत भारतीय लष्कराच्या सेवेतील एका जवानाचाही समावेश झाला आहे. लडाख येथील या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर येत आहे. या जवानाच्या वडिलांनी इराण येथील एका धार्मिक स्थळाला भेट दिली होती अशी माहिती मिळाली आहे. 

संपूर्ण भारतीय लष्करामध्ये कोरोनाची लागण होणारा हा पहिला जवान ठरत आहे. त्यामुळे आता सतर्कतेची पावलं आणखीन कठोर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सैन्यदल अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लडाख स्काऊट्स येथील लांस नायक कोरोनाच्या चाचणीमध्ये सोमवारी पॉझिटीव्ह आढळले. 

२७ फेब्रुवारीला या जवानाचे वडील इराण येथून भारतात परतले होते. 'त्यांच्या वडिलांना २९ फेब्रुवारीपासून अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. लडाख हार्ट फाऊंडेशन येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर ६ मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती मिळताच त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं', अशी माहिती सूत्रांनी दिली. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

कोरोनाची लागण झालेला हा जवान २५ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंतच्या काळात सुट्टीवर होता. ज्यानंतर २ मार्चला तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता. कामावर रुजू होऊनही तो चकोट या गावी असणाऱ्या त्यांच्या कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करत होता, काही कामांमध्ये त्यांना हातभार लावत होते. दरम्यान, वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचं करताच जवानालाही अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.