मतमोजणीआधी व्हीव्हीपॅट पावत्या न मोजण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हीव्हीपॅट पावती मोजण्याच्या प्रक्रियेत काही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Updated: May 22, 2019, 02:32 PM IST
मतमोजणीआधी व्हीव्हीपॅट पावत्या न मोजण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाचे एक्झिट पोल जारी झाले आहेत. यामध्ये भाजपाप्रणित एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचे दाखवण्यात आले. या एक्झिट पोलवरून विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीआधी व्हीहीपॅट मशिनमधील पावत्या मोजाव्यात अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाला केली होती. पण आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. व्हीव्हीपॅट पावती मोजण्याच्या प्रक्रियेत काही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅटची पडताळणी ईव्हीएमशी होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे प्रथम ईव्हीएम मतमोजणी पार पडल्यानंतर त्या मतांची पडताळणी व्हीव्हीपॅटशी होणार आहे. 

मतदान झाल्यानंतर मतमोजणी केंद्रापर्यंत इव्हीएम पोहोचवताना घोळ झाल्याची तक्रार विरोधी पक्षांनी केली होती. पण प्राथमिक तपासणीत ही तक्रार फेटाळून लावण्यात आली. मतदानास वापरलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन स्ट्रॉंग रुममध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाच्या दिल्लीतील मुख्यालयात ईव्हीएम संदर्भातील तक्रार निवारणासाठी एक नियंत्रण कक्ष देखील सुरु आहे.