कोलकात्यात राजकीय पतंगबाजी, एकाच दुकानात सर्व पक्षांचे पतंग

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच पतंगांचाही हंगाम सुरू झाला आहे.

Updated: Apr 7, 2019, 06:10 PM IST
कोलकात्यात राजकीय पतंगबाजी, एकाच दुकानात सर्व पक्षांचे पतंग title=

कोलकाता : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराचा नारळ फो़डला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच पतंगांचाही हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळेच पतंगांच्या दुकानात विविध पक्षांची चिन्हे असलेली पतंग दिसू लागलेत. कोलकात्यात दुकानांमध्ये राजकीय पक्षांच्या चिन्हांच्या पतंगाची गर्दी दिसू लागली आहे. प्रचारातून वेळ काढून कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे पतंग उडवताना दिसत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अशात पश्चिम बंगालमध्ये सध्या पतंग उडवण्याचा हंगाम सुरू आहे. निवडणुकीची धामधूम असताना पतंगांच्या या उत्सवावर निवडणुकीचा प्रभाव पडणार नाही असं होणार नाही. पश्चिम बंगालमधील पतंगांच्या दुकानात आता वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हांचे पतंग पाहायला मिळत आहेत. भाजपा, काँग्रेसचे पतंग दुकानात दिसतात पण सर्वात जास्त मागणी माकपा आणि तृणमूल काँग्रेसच्या पतंगांना आहे. सध्या तरी भाजपाच्या पतंगांकड़े कुतुहलाने पाहिले जात आहे.

अजित दत्ता यांचे पतंगांचे दुकान जणू काही निवडणूक कार्यालय झाले आहे. निवडणुकीत कुणी कुणाची कन्नी कापली हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे पतंग आकाशात उंच उंच जाऊ देण्यास हरकत नाही.