'तुम्ही सिद्धू मुसेवालाचं...', BJP 350 पार Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदींचाही उल्लेख

Lok Sabha Election Exit Polls 2024 Rahul Gandhi First Comment: पंतप्रधान मोदींनी एक्झिट पोल आले त्या दिवशीच पहिली प्रतिक्रिया नोंदवली असली तरी राहुल गांधींनी दुसऱ्या दिवशी या आकडेवारीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना मोदींचा उल्लेख केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 2, 2024, 01:50 PM IST
'तुम्ही सिद्धू मुसेवालाचं...', BJP 350 पार Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदींचाही उल्लेख
राहुल गांधींनी नोंदवली पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Polls 2024 Rahul Gandhi First Comment: लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांचं मतदान शनिवारी, 1 जून 2024 रोजी पूर्ण झालं. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या निकालपूर्व एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीचं सत्तेचं स्वप्न यंदाही अपूर्णच राहणार असल्याची शक्यता आहे. केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणूक पूर्व अंदाजांची आकडेवारी मांडणाऱ्या एक्झिट पोलची चर्चा असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी 350 चा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल फेटाळले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्याबाहेर त्यांनी पत्रकारांना अगदी मोजक्या शब्दात एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली. "या सर्वेक्षणांचं नाव एक्झिट पोल नसून हे 'मोदी मिडीया पोल' आहेत. हे मोदीजींचे फॅण्टसी पोल आहेत," असं राहुल गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेस कार्यालयाकडे चालू लागले. मात्र एका पत्रकाराने 'तुमच्या हिशोबाने किती जागा मिळतील?' असा प्रश्न कॅमेराकडे पाठ करुन जात असलेल्या राहुल गांधींना विचारला. राहुल गांधी हा प्रश्न ऐकून मागे वळाले आणि प्रसारमाध्यमांच्या माईक्ससमोर येऊन पुढे बोलताना राहुल गांधींनी, "तुम्ही सिद्धू मुसेवालाचं 295 गाणं ऐकलं आङे का? आम्हाला 295 जगा मिळतील," असं म्हणून राहुल गांधी कार्यालयात निघून गेले. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची बैठक आज पार पडत असून त्यानिमित्तानेच राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयामध्ये आले होते.

मोदींनीही नोंदवली पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन शनिवारीच पहिली प्रतिक्रिया नोंदवली. आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन मोदींनी, "मी पूर्ण आत्मविश्वासने सांगू इच्छितो की मतदारांनी विक्रमी संख्येने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची पाठराखण केली आहे. विरोधकांना जनतेनं पूर्णपणे नाकारले असून त्यांचा प्रचार केवळ मोदी द्वेषावर अवलंबून होता. ज्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान केलं त्यांचे मी आभार मानतो," असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 2019 चे Exit Poll किती अचूक होते? सर्वेक्षणाची आकडेवारी अन् निकालात नेमका किती फरक?

काँग्रेस अध्यक्षांनीही फेटाळले एक्झिट पोलचे आकडे

कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर ती फेटाळून लावत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More