नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रियांका यांना कॉंग्रेसचे महासचिव बनवून पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावर राजकारणातून प्रतिक्रिया येणे सुरूच आहे. अनेकांना त्यांच्यामध्ये माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांचीच छबी दिसते. प्रियांकांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये उत्साह आणि बळकटी येईल असेही मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका गांधी या चांगल्या महिला आहेत आणि राहुल गांधी यांनी देखील मान्य केलंय की ते एकट्याने राजकारण करु शकत नाहीत. म्हणून त्यांनी प्रियांका यांची मदत घेतल्याचा चिमटाही सुमित्रा महाजन यांनी काढला.
प्रियांका गांधी यांच्या राजकिय प्रवेशानंतर भाजप प्रवक्ता संदीप पात्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधी यांच्या अयशस्वीपणाची ही सार्वजनिक घोषणा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. नव्या भारतात कधीपर्यंत परिवारवाद सुरू राहणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्यासाठी पार्टी हाच परिवार आहे तर त्यांच्यासाठी परिवारच पार्टी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Lok Sabha Speaker Sumitra Mahajan: She (Priyanka Gandhi Vadra) is a good woman, & Rahul Ji has accepted he can’t do politics all alone, and for that he is taking Priyanka’s help. It is a good thing. pic.twitter.com/0ztrXx2OjL
— ANI (@ANI) January 24, 2019
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी देखील याप्रकरणी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. सर्वांना माहिती आहे की हा गांधी परिवाराचाच पक्ष आहे. राहुल गांधी यांचे हे अपयश आहे. परिवारवादावर त्यांचे काय म्हणणे आहे हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे असेही ते म्हणाले.
गुलाम नबी आझाद यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाहून बाजूला कर प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पुर्व आणि ज्योतिरादित्य सिंधिंया यांना पश्चिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यभाग स्वीकारणार आहेत.