पाटणा : पाटणा युनिव्हर्सिटीच्या बीन महाविद्यालयातील प्रोफेसर आणि 'लव्हगुरू' म्हणून ओळखले जाणारा मटुकनाथ चौधरी बुधवारी सेवेतून निवृत्त झालेत. त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडियातूनही केलीय... यावेळी आपले निवृत्तीनंतरचे प्लान्स सांगायला ते विसरले नाहीत. निवृत्तीनंतर आता आपण केवळ लग्न आणि मस्ती करणार... आता तर आपल्यातल्या तरुणपणानं आळस झटकलाय, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
मटुकनाथ दशकभरापूर्वी म्हणजेच २००४ साली आपल्या प्रेमसंबंधांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. तेव्हा ५१ वर्षांचे असलेले मटुकनाथ आपल्याच विभागातील २१ वर्षांची विद्यार्थीनी जुली हिच्या प्रेमात पडले होते. या प्रेम संबंधांना मटुकनाथ यांच्या पत्नीनं जाहीररित्या आक्षेपही व्यक्त केला होता... पत्नीनं भररस्त्यात पती आणि त्याच्या प्रेयसीवर आगपाखड केल्यानं ही गोष्ट चर्चेत आली होती.
आता आपल्या निवृत्तीनंतरचे प्लान्स सांगताना मटुकनाथ यांनी म्हटलंय, 'आताच तरुणाईनं आळस झटकलाय. अंगा-अंगातून तरुणाई झळकतेय... या चढत्या तरुणाईत निवृत्त होतोय हे माझं भाग्य... लोक विचारतात निवृत्तीनंतर काय करणार? निवृत्तीनंतर तेच करणार जे तरुणाईत केलं जातं... म्हणजेच विवाह करणार'.
मी एक वर्ष केवळ भ्रमण करणार... आणि त्यानंतर पाटण्यात प्रेमाची शाळा सुरू करणार... या शाळेत जीवन दर्शन आणि प्रेमाचं शिक्षण दिलं जाईल, असंही मटुकनाथ यांनी म्हटलंय.
दरम्यान, ज्या जुलीसाठी मटुकनाथ यांनी आपलं घर-दार पणाला लावलं होतं... तिनं त्यांची साथ कधीच सोडलीय. काही महिन्यांपूर्वीच ज्युलीनं मटुकनाथ यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघंही १२ वर्ष एकत्र होते. मटुकनाथ यांच्या म्हणण्यानुसार, जुलीचा जगाशी मोहभंग झालाय आणि ती अध्यात्माकडे झुकलीय.