नवी दिल्ली : सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. ही सबसिडी देण्यात येणाऱ्या बँकेबाबत सरकारनं निर्णय घेतला आहे. एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये ही सबसिडी आता जमा होणार नाही. एअरटेल पेमेंट बँकेत खातं असणाऱ्या ग्राहकांना गॅस सबसिडीचा फायदा मिळणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. याबाबत मंत्रालयाकडून तपास केला असता ही खाती एअरटेल पेमेंट बँकेची असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एअरटेल टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. ही कंपनी आता पेमेंट बँकिंगच्या क्षेत्रातही उतरली आहे. ज्यांनी एअरटेल पेमेंट बँकेमध्ये खातं उघडलं आहे. त्यांनी या खात्याला आधार कार्ड लिंक केलं आहे, त्यामुळे या खात्यावर LPG सबसिडी जमा होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.