कूनो नॅशनल पार्कमधून पुन्हा वाईट बातमी, चित्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या वर्षभरात तीन चित्यांच मृत्यू झाला आहे. त्यातच आता तीन बछड्यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्वाला नावाच्या मादि चित्याने चार बछड्यांना जन्म दिला होता.

राजीव कासले | Updated: May 25, 2023, 06:16 PM IST
कूनो नॅशनल पार्कमधून पुन्हा वाईट बातमी, चित्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू title=

Kuno National Park : मध्य प्रदेशमधल्या कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) पुन्हा एक वाईट बातमी आली आहे. नामिबियातून (Namibia) आणलेल्या चित्याच्या (Cheetah) आणखी दोन बछड्यांचा (Cub) मृत्यू झाला आहे. याआधी 23 मे रोजी एका बछड्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी ज्वाला नावाच्या मादी चित्याने 4 बछड्यांना जन्म दिला होता. पण 23 मे रोजी एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्वाला (Jwala) आणि तीन बछड्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण आज आणखी दोन बछड्यांचा मृत्यू झाला. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत तीन बछडे आणि तीन चित्यांचा मृत्यू झाला आहे. 

मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मे रोजी उन्हाची तीव्रता प्रचंड होती. त्यातच त्यांची प्रकृती नाजूक होती. ही सर्व परिस्थिती पाहता वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाने तिनही पिल्लांवर तात्काळ उपचार करण्याचा निर्णय घेतला. पण उपचारादरम्यान दोन बछड्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

एका बछड्याची प्रकृती गंभीर
आता चार बछड्यांपैकी एकच बछडा जीवंत असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या बछड्याला पालपूर स्थित रुग्णालयात ठेवण्यात आलं असून त्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. उपचारासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. मादी जिता ज्वालाची तब्येत ठिक असून तिलाही देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 

कमी वजन आणि  डिहाइड्रेशनमुळे मृत्यू
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कमी वजन आणि  डिहाइड्रेशनमुळे (Dehydration) बछड्यांचा मृत्यू झाला. मादी चिता ज्वाला पहिल्यांदाच आई बनली आहे. बछड्यांचं वय जेमतेम 8 आठवड्यांचं असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी आईबरोबर फिरण्यास सुरुवात केली होती. नियमानुसार मृत बछड्यांचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे. 

20 चिते आणले
गेल्या वर्षी म्हणजे 17 सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतन 12 चिते कूनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. प्रोजेक्ट चिता अंदर्गत एकूण 20 चिते आणण्यात आले. यातल्या नामिबियातून आणलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्याने 24 मार्चला कुनो नॅशनल पार्कमध्ये 4 बछड्यांना जन्म दिला. यातल्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. 

3 चित्यांचा मृत्यू
बछड्यांच्या मृत्यूआधी कूनो नॅशनल पार्कमध्ये तीन चित्यांचा मृत्यू झाला आहे. 9 मे रोजी दक्षा नावाची मादी चिता जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याआधी 23 एप्रिलला उदय नावाच्या चित्याचा मृत्यू झाला. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि यातच त्याचा मृत्यू झाला होता. तर 26 मार्चला साशा नावाच्या मादी चित्याच्या किडनीत संसर्ग झाला आणि दोन महिन्यांच्या उपचारानंतरही तिला वाचवण्यात अपयश आलं.