ज्योतिरादित्य यांच्या अडचणीत होणार वाढ, कमलनाथ उघडणार 'ही' फाईल्स

 ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत.  

Updated: Mar 13, 2020, 12:26 PM IST
ज्योतिरादित्य यांच्या अडचणीत होणार वाढ, कमलनाथ उघडणार 'ही' फाईल्स title=
संग्रहित छाया

भोपाळ : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh ) राजकीय संघर्ष अद्यापही कायम आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी बंड करत काँग्रेसचा हात सोडून हाती कमळ घेतले. मात्र, त्याचवेळी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला होता. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत मुख्यमंत्री कमलनाथ सरकारवर (CM Kamalnath) टीका केली होती. आता ही टीका त्यांना भारी पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हं आहेत. ज्योतिरादित्य यांच्याविरोधातल्या कथित घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्याचा निर्णय, मध्य प्रदेशच्या आर्थिक गुन्हे शाखेने घेतला आहे. 

भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य यांच्या गटातल्या समर्थक २२ आमदारांनीही आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य यांच्याविरोधातल्या या कारवाईनं लक्ष वेधले आहे. केंद्रात मंत्री असताना ज्योतिरादित्य आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गैरव्यवहाराची ही तक्रार आहे. त्याचा नव्याने तपास करण्याचा निर्णय आर्थिक गुन्हे शाखेने घेतला आहे. याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्या अडचणी वाढणार याचे संकेत मिळत आहे.

भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १० हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप सुरेंद्र श्रीवास्तव यांनी २०१४ मध्ये केला होता. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. नंतर ही चौकशी थांबविण्यात आली होती. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेंद्र श्रीवास्तव यांनी पत्र लिहून आर्थिक गुन्हे विभागाकडे जमीन घोटाळ्याच्या चौकशीची पुन्हा मागणी केली आहे.