मुंबई : मध्य प्रेदशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदौरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पाच रुपयांसाठी एका शेकऱ्याची मारहाण करून हत्या करण्यात आली. ढाब्यावर जेवणाऱ्या शेतकऱ्याकडे ५ रुपये कमी पडले. इंदौरजवळील सिमरोल येथे ही घटना घडली. पाच रुपये कमी पडल्याने ढाबा चालक भावांनी मारहाण करुन शेतकऱ्याची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ढाब्यावर जेवून झाल्यावर शेतकरी असलेल्या धर्मेन्द्र यांनी पाच रुपयांच एक पाऊच खरेदी केलं. जेवणाचं बील चुकतं केल्यानंतर त्यांच्याकडे पाऊचचे पाच रुपये कमी पडत होते. या कारणावरून ढाबा मालकासोबत त्याचा वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढला की ढाबा चालक सतीशने आपल्या भावांसोबत मिळून धर्मेंद्रला जबर मारहाण केली. त्याला उचलून बाहेरही फेकण्यात आलं.
मारहाणीनंतर पोलीस शेतकऱ्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याची तब्बेत खूप बिघडली होती. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी जवळच्यांनी पोलिसांना दिली. सिमरोल पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा हॉस्पीटलला पाठवला. शेतकऱ्याच्या मृत्यूच्या कारणांचा असून खुलासा झाला नाही. पण त्याच्या जवळचे मारहाण झाल्याचे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोस्टमार्टम अहवालातून येणाऱ्या कारणावरून पोलीस प्रकरण दाखल करणार आहेत.