मुंबई : दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. आज दिल्लीत 648 कोरोना रुग्ण तर महाराष्ट्रात 2,962 रूग्ण सापडले आहेत. यासह Omicron च्या BA.4 आणि BA.5 या प्रकारांची काही प्रकरणे दिल्लीसह राज्यात आढळली आहेत. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागांची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,राज्य़ात 2,962 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीतून फक्त मुंबईत 761 नवीन रुग्ण आढळले आहेत. Omicron च्या BA.4 प्रकाराचा एक रुग्ण देखील दिसून आला आहे. या दरम्यान महाराष्ट्रात कोरोनामुळे 6 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी राज्यात 2,971 रुग्णसंख्या होती आणि पाच जणांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात कोरोनाचे 22,485 सक्रिय रुग्ण आहेत.
ओमिक्रॉनचा वाढला धोका
राज्यात ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 कोरोना रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे. पुण्यात 15, मुंबईत 34, नागपूर, ठाणे आणि पालघरमध्ये प्रत्येकी चार आणि रायगडमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 761 कोरोनाबाधितांसह तीन मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यू दर आता 1.85 टक्के आहे.
दिल्लीत 648 रुग्ण
दिल्लीत रविवारी कोरोनाचे 648 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 3,268 वर पोहोचली आहे. तसेच आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह दर 4.29 टक्के आहे. सलग चौथ्या दिवशी दिल्लीत 1,000 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. शनिवारी दिल्लीत कोविड-19 चे 678 रुग्ण आढळून आले होते तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी, दिल्लीमध्ये 5.30 टक्के पॉझिटिव्ह दर नोंदविला गेला होता. तर 813 रूग्णसंख्येची नोंद झाली होती.
Omicron च्या BA.4 आणि BA.5 प्रकारांच्या काही प्रकरण दिल्लीत आढळली आहेत. कोरोनाचे हे दोन्ही प्रकार वेगाने संसर्ग पसरवतात. पण त्यामुळे गंभीर संसर्ग होत नसल्याने घाबरण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.