Corona JN.1: राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 50 नवीन रुग्ण आढळून आले आहे. मुख्य म्हणजे यापैकी 9 प्रकरणे ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची आहेत. यासह राज्यातील नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या 10 झाली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
केरळमध्ये रविवारी कोरोनामुळे आणखी एक मृत्यू झाला. राज्यात गेल्या 4 दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात या ठिकाणी 425 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 707 रुग्ण आढळले आहेत. यामुळे एक्टिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 792 झाली आहे. 24 तासांत 333 लोक कोरोनामधून बरे झाल्याचीही माहिती आहे. केरळनंतर कर्नाटकमध्ये कोरोनाचा प्रभाव दिसून येतोय. या ठिकाणी 24 तासांत येथे 104 नवीन रुग्ण आढळले असून 8 लोक बरे झाले आहेत.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरपासून राज्यात कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. इतर राज्यांपेक्षा जास्त चाचण्या होतायत. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये. या काळात 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीये. नवीन मृत्यूच्या संख्येतही गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांच्या मते, पहिला JN.1 प्रकार 8 डिसेंबर रोजी केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये थे आढळून आला होता. या ठिकाणी 79 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेमध्ये इन्फ्लूएंझा सारखी आजाराची सौम्य लक्षणं दिसून आली होती.