MDH च्या धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

 धरमपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

Updated: Dec 3, 2020, 09:17 AM IST
MDH च्या धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : एमडीएचच्या (MDH)प्रत्येक जाहिरातीत दिसणारे आजोबा धरमपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. धरमपाल गुलाटी यांनी ३ डिसेंबरला सकाळी ५.३८ वाजता  दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात (Mata Chanan Devi Hospital )अखेरचा श्वास घेतला. कोरोना वायरसने संक्रमित झाले होते. यातून बरे झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं. 

धरमलाल यांचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला. देशाच्या फाळणीदरम्यान 1947 नंतर त्यांचे वडील दिल्लीत येऊन स्थायिक झाले. 60 वर्षांपूर्वी धरमपाल एमडीएचमध्ये रुजू झाले. ग्राहकांना कमीत कमी पैशांत गुणवत्तापूर्ण मसाले मिळावे या प्रेरणेतून त्यांनी काम सुरू केलं.

कोण आहेत धर्मपाल गुलाटी?

एमडीएच मसाला कंपनीचे मालक असलेले महाशय धर्मपाल यांचा जन्म २७ मार्च १९२७ ला सध्याच्या पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला. १९३३ मध्ये धर्मपाल गुलाटी यांनी ५वीत असतानाच शिक्षण सोडलं. १९३७ साली धर्मपाल गुलाटी यांनी वडिलांच्या मदतीनं काचेचा छोटा व्यापार सुरू केला. यानंतर त्यांनी साबण आणि इतर अनेक व्यापारही केले. या व्यापारांमध्ये धर्मपाल यांचं मन लागलं नाही. अखेर त्यांनी मसाल्यांचा व्यापार सुरू केला. धर्मपाल गुलाटींचे पुर्वजही मसाल्याचाच व्यापार करत होते.

महाशय धर्मपाल गुलाटींच्या परिवारानं छोटासा व्यापार सुरु केला. यानंतर त्यांनी हळू हळू दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमधली दुकानं विकत घेतली. कुटुंबानं पै न पै जोडून व्यापार वाढवला. सुरुवातीला मसाले दळण्याचं काम घरी व्हायचं पण व्यापार वाढल्यानंतर आता पहाडगंजच्या मसाला गिरणीमध्ये मसाले दळले जातात.

कशी झाली एमडीएचची स्थापना?

महाशय दी हट्टी (एमडीएच)ची स्थापना सियालकोटमध्ये झाली होती. पण फाळणीनंतर हे कुटुंब १९४७ साली दिल्लीत स्थायिक झालं. दिल्लीमध्ये आल्यानंतर गुलाटी यांनी एक टांगा घेतला. धर्मपाल गुलाटी हा टांगा कॅनॉट प्लेस ते करोल बाग या भागात चालवायचे. अनेकवेळा गुलाटींना एकही प्रवासी मिळायचा नाही. अखेर गरिबीला कंटाळून गुलाटी यांनी तो टांगा विकला आणि १९५२ साली चांदणी चौकात एक दुकान भाड्यानं घेतलं. या दुकानाचं नाव त्यांनी एमडीएच ठेवलं आणि मसाले विकायला सुरुवात केली.

एमडीएचची अधिकृत सुरुवात १९५९ साली झाली जेव्हा गुलाटींनी किर्ती नगरमध्ये एक जागा विकत घेतली आणि उत्पादनला सुरुवात केली. आता एमडीएच कंपनी जगभरामध्ये मसाले विकते.

सर्वाधिक पगार असणारे सीईओ

२०१७ मध्ये धर्मपाल गुलाटी हे एफएमसीजीमधले सर्वाधिक पगार घेणारे सीईओ होते. पाचवीमध्येच शिक्षण सोडलेल्या गुलाटी यांचा २०१७ सालचा पगार २१ कोटी रुपये होता. गोदरेजचे आदी गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदूस्तान युनीलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वायसी देवेश्वर यांच्यापेक्षा गुलाटींचा पगार जास्त आहे.

इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार एमडीएचचा निव्वळ नफा २१३ कोटी रुपये होता तर कंपनीचा महसूल ९२४ कोटी रुपये इतका आहे. एमडीएच कंपनीमध्ये गुलाटी यांची ८० टक्के भागीदारी आहे.

९२ व्या वर्षीही धर्मपाल गुलाटी निवृत्त झालेले नाहीत. एखाद्या तरुणाला लाजवेल एवढं काम ते करतात. आजही कंपनीच्या व्यापाराबद्दलचे निर्णय धर्मपाल गुलाटीच घेतात. एमडीएचच्या अधिकृत वेबसाईटनुसार कंपनी सध्या ६२ वेगवेगळी उत्पादन जगभरामध्ये विकत आहे.

धर्मपाल गुलाटींचं समाजकार्य 

धर्मपाल गुलाटी यांनी त्यांच्या वडिलांच्या नावानं महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. ही ट्रस्ट २५० बेडचं रुग्णालय, झोपडपट्टी वासियांसाठी मोबाईल रुग्णालय आणि ४ शाळा चालवतं.