'गांधी' अध्यक्ष नको, राहुल गांधी राजीनाम्यावर अडून

 नवा कॉंग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसावा असेही राहुल यांनी सांगितले. 

Updated: May 27, 2019, 06:29 PM IST
'गांधी' अध्यक्ष नको, राहुल गांधी राजीनाम्यावर अडून  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसने देशभरात सपाटून मार खाल्यानंतर पराभव स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेत्यांना हा राजीनामा मान्य नाही. पण राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर अडून बसले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी सोमवारी पार्टीचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांची भेट घेतली. यावेळी पार्टी अध्यक्ष राहणार नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट सांगितले. माझ्याजागी पर्याय शोधावा आणि नवा कॉंग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसावा असेही राहुल यांनी सांगितले. 

राहुल गांधी हे प्रचार करत असताना त्यांचे ज्येष्ठ नेते हे हातावर हात ठेवून पाहत राहीले या गोष्टीवर राहुल नाराज आहेत. पार्टी जिंकण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी फार मेहनत घेतली नाही. पार्टीला निवडणूक जिंकवण्यात मदत केली नाही. नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ आणि अशोक गहलोत यांच्यासहित एक डझन ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांवर त्यांची नाराजी आहे. तसेच आपल्या नजीकच्यांना तिकिट मिळावे यासाठी काही प्रदेशाध्यक्ष धडपड करत असल्याचेही राहुल यांच्या नजरेस आले. 

जितक्या मजबुतीने प्रचार गरजेचा होता तितका झाला नाही. तसेच पार्टीचा दारुण पराभव झाला तरी कोणत्या प्रदेशाध्यक्षाने राजीनाम्याचा प्रस्ताव पाठवला नाही. राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर बाकीच्यांनी प्रस्ताव पाठवले.