नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या मीटू मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.
६ राष्ट्रीय पक्ष आणि ५९ राज्य पातळीवरील पक्षांनी पुढल्या १० दिवसांत याची अंमलबजावणी करावी, असं गांधी यांनी या पत्रात म्हटलंय. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांसाठी अशा समित्या स्थापन करण्याबाबत २०१३मध्ये कायदा करण्यात आलाय. राजकीय पक्षांमध्येही महिला काम करतात, त्यामुळे पक्षांनीही अशा समित्या स्थापन कराव्यात, अशी केंद्र सरकारची सूचना आहे.