Lockdown : अखेर ते मजुर 'स्व'राज्याच्या दिशेने रवाना

लॉकडाऊन असतानाही ....

Updated: Apr 28, 2020, 11:46 AM IST
Lockdown : अखेर ते मजुर 'स्व'राज्याच्या दिशेने रवाना title=
संग्रहित छायाचित्र

सुरत : CORONAVIRUS कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉ़कडाऊन जाहीर केल्यानंतर सर्वत स्तरांवरीच कार्यपद्धती ठप्प झाली. दळणवळणाच्या सोयीसुविधांपासून लहानमोठ्या कारखान्यांमधील कामही थांबलं. या परिस्थितीमध्ये परराज्यांतून विविध ठिकाणी कामाच्या निमित्ताने वास्तव्यास असणाऱ्या मजुरांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्वगृही परतण्यासाठीच अशा कैक मजुरांची धडपड सुरु झाली. मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर परराज्यातील अशाच असंख्य मजुरांचा उद्रेकही पाहायला मिळाला. 

परिस्थितीनुरुप या मजुरांसाठी काही निर्णय घेतले जाण्यासाठी नेते आणि संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडूनही पावलं उचलली जात आहेत. त्यातच आता सुरत येथून काही मजुर लॉकडाऊन असतानाही त्यांच्या मुळ राज्यांच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर येत आहे. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील या मजुरांसाठी विशेष परवानगी पासची तरतूद केली आहे. खुद्द मजुरांनीच या वाहनांची व्यवस्था केली असून, या माध्यमातून ते टप्प्याटप्प्याने आपआपल्या राज्यांमध्ये जाणार आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील मजुरांना हे पास देण्यात आले आहेत. 

अधिकृत सुत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर  जवळपास दीड हजारहून अधिकर मजुरांनी नोंदणी केली असून, आपल्या राज्यात परतण्याच्या प्रतिक्षेत ते असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे स्वत:च्या राज्यात गेल्यानंतरही या मजुरांना क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेले पास हे एकमार्गी प्रवासाच्या अनुमतीसाठीचेच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जाणाऱ्या बस परतताना रिकाम्या परतून जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची नोंद केली जाणं अपेक्षित आहे. 

 

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या मजुरांसाठी फक्त पास देण्याच आले आहेत. अमुक एका राज्यात त्या मजुरांना प्रवेश मिळेलच याबाबतची जबाबदारी मात्र घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात 'स्व'राज्याच्या दिशेने निघालेले हे मजुर त्यांच्या राज्यात नेमके कधी पोहोचतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.