close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या माजी सीबीआय संचालकांना मिळाली अशी शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी नागेश्वर राव मंगळवारी न्यायालयात हजर झाले होते

Updated: Feb 12, 2019, 05:04 PM IST
न्यायालयाचा अवमान करणाऱ्या माजी सीबीआय संचालकांना मिळाली अशी शिक्षा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव Nageshwar Rao) यांना दोषी ठरवण्यात आलंय. सरन्यायाधीशांनी मंगळवारी सुनावणी करताना नागेश्वर राव यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी करार दिलं. यासाठी त्यांना शिक्षा म्हणून दिवसभर न्यायालयात उभं राहण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. सोबतच एक लाखांचा दंडही नागेश्वर यांना ठोठावण्यात आलाय.  

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी नागेश्वर राव मंगळवारी न्यायालयात हजर झाले होते. सीबीआयकडून ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. नागेश्वर राव यांनी आपल्या चुकीची माफी मागितली आहे त्यांनी जाणून-बुजून न्यायालयाचा अवमान केला नसल्याचं वेणुगोपाल यांनी म्हटलं. 

परंतु, सरन्यायाधीशांनी यावर आपली नाराजी व्यक्त करत ए के शर्मा यांच्या बदलीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून परवानगी का मागण्यात आली नाही? असा प्रश्न विचारला. नागेश्वर राव यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती होती. म्हणूनच त्यांनी कायदे विभागाची मदत मागितली होती. ही बदली करण्यापूर्वी कोर्टासमोर एफिडेविट दाखल करणं आवश्यक होतं, असंही सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय.

सीबीआयच्या संचालक पदावर असताना आपण यांनी चौकशी समितीचे माजी संयुक्त संचालक ए के शर्मा यांची बदली करून 'चूक' केली, याची कबुली नागेश्वर राव यांनी सोमवारी न्यायालयासमोर दिली होती. यासाठी त्यांनी ७ जानेवारी रोजी न्यायालयाची विनाअट माफीही मागीतली होती. 

ए के शर्मा बिहारमधील बालिका गृह प्रकरणाची चौकशी करत होते, त्यावेळी त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबद्दल न्यायालयानं सीबीआयला फटकारलं होतं.