राफेल प्रकरणी मोदींकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग, गुन्हेगारी कारवाईची राहुल गांधींची मागणी

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्याच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

Updated: Feb 12, 2019, 12:35 PM IST
राफेल प्रकरणी मोदींकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग, गुन्हेगारी कारवाईची राहुल गांधींची मागणी title=

नवी दिल्ली - फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्याच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान फ्रान्सला येतील आणि दोन्ही देशांमध्ये एक सामंजस्य करार होईल, असे तेथील अधिकाऱ्यांना सांगितले होते. हा करार म्हणजेच राफेल करार असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी देशाच्या संरक्षण मंत्र्यांना, परराष्ट्र सचिवांना ज्याची माहिती नव्हती, ती अनिल अंबानी यांच्यापर्यंत कशी पोहोचली, असा थेट प्रश्न मंगळवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच नरेंद्र मोदींनीच ही माहिती अनिल अंबानी यांना दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधानांनी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हेगारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांपासून केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. या करारामध्ये एचएएलला डावलून अनिल अंबानी यांच्या कंपनीला काम कसे काय देण्यात आले, असे प्रश्न त्यांनी याआधी विचारले आहेत. आता एका ई-मेलच्या साह्याने त्यांनी अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट यावरून आपल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे. राफेलचा करार होण्याच्या १५ दिवस आधी अनिल अंबानी फ्रान्सला गेले होते. तिथे त्यांनी तेथील संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मार्च २०१५ मध्येच ही भेट झाली होती, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर एक ई-मेलच्या साह्याने त्यांनी अनिल अंबानी यांना राफेल कराराची अगोदरच माहिती होती. त्यासाठीच त्यांनी फ्रान्समधील अधिकाऱ्यांना लवकरच एक सामंजस्य करार होईल, असे आश्वासन दिले होते. हा करार म्हणजेच राफेल करार होता. राफेल कराराबद्दल देशाचे तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनाही काही माहिती नव्हती. देशाच्या परराष्ट्र सचिवांना काही माहिती नव्हती, मग ती अनिल अंबानी यांना कशी काय होती, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पंतप्रधानपद स्वीकारताना नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हेगारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. 

'कॅग'च्या अहवालाची खिल्ली
दरम्यान, या प्रकरणी कॅगच्या अहवालाचीही राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. हा अहवाल म्हणजे चौकीदार ऑडिटर जनरल (कॅग) असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हा अहवाल म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी लिहिलेला अहवाल असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.