Mukesh Ambani Success : संपूर्ण जगासह आशिया खंडातील धनिकांच्या यादीत गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांचं नाव उद्योग विश्वात अतिशय आदरानं घेतलं जातं. सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या यशाचे आणि त्यांच्या श्रीमंतीचे अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर या यशासमवेत अंबानींची साधी राहणीसुद्धा अनेकांवर छाप पाडताना दिसते. अशा या मुकेश अंबानींना म्हणे वाचनाची फार आवड.
पुस्तक वाचनाची आवड असणारे मुकेश अंबानी एकाच वेळी टप्प्याटप्प्यानं चार ते पाच पुस्तकांचं वाचन करतात. प्रामुख्यानं अशी 9 पुस्तकं आहेत, जी वाचण्याला ते कायम प्राधान्य देतात. किंबहुना असंही म्हटलं जातं की त्यांच्या पुस्तकांच्या संग्रहात या पुस्तकांचा हमखास समावेश असतो. ते फक्त ही पुस्तकं वाचत नाहीत, तर त्यातून बोध घेत प्रत्यक्ष जीवनात त्या संदर्भांचं आचरण आणि पालनही करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वीच खुद्द हर्ष गोएंका यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून व्हिडीओ क्लीप शेअर केला होता. जिथं मुकेश अंबानी यांनी आपल्याला त्यांच्या आवडत्या पुस्तकांविषयी सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं. 'मी बरंच तंत्रशुद्ध वाचन करतो. ज्यामध्ये सध्या मी जीन एडिटिंग आणि ब्लॉकचेनविषयी वाचतोय', असं ते म्हणाले. व्हिडीओनुसार सध्या अंबानी ज्या जीन एडिटिंगचा उल्लेख करताना दिसले त्या पुस्तकाचं नाव आहे CRISPR/Cas Genome Editing. अंजनाभा भट्टाचार्य, विलास पार्खी आणि भरत चार या पुस्तकाचे लेखक असून, ब्लॉकचेन पुस्तकाचे लेखक एलन राईट आहेत.
आपण Non Fiction पुस्तकांचंही वाचन करतो सांगताना अंबानी म्हणाले होते, 'मी एका वेळी पाच ते सहा पुस्तकं वाचतो. मी वॉल्टर इसाकसन द्वारा लिखित लियोनार्डो दा विंची वाचलंय. ते माझे आवडते लेखक आहेत'. आपल्याला डॅन ब्राऊन यांचं 'ओरिजिनल' हे पुस्तकही आवडतं असंही त्यांनी न विसरता सांगितलं.
2021 मध्ये ब्लूमबर्गनं अंबानींच्या आवडीच्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली होती. याच पुस्तकांची नावं आणि त्यांचे संदर्भ पाहता हेच अंबानींच्या यश आणि श्रीमंतीचं गमक असावं असं मत अनेकांनी बांधलं. अंबानींच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत फरीद जकारिया लिखित Ten Lessons for a Post-Pandemic World, रे डालियो यांचं Principles for Dealing with the Changing World Order: Why Nations Succeed and Fail, एलेक रॉस यांनी लिहिलेलं The Raging 2020s: Companies, Countries, People—and the Fight for Our Future, माउरो ग्विलेन यांचं 2030: How Today’s Biggest Trends Will Collide and Reshape the Future of Everything आणि जोश लिंकनरच्या Big Little Breakthroughs: How Small, Everyday Innovations Drive Oversized Results पुस्तकांचा समावेश होता, ज्यांचं वाचन अंबानी यांनी केल्याचं सांगण्यात आलं होतं.
वाचाल तर वाचाल... असा एक सुविचार आहे. प्रत्यक्ष जीवनात या विचाराचा नेमका अर्थ आणि त्यामुळं होणारी नेमकी मदत काय स्वरुपातील असते याचाच एकंदर अंदाज अंबानींसारखी माणसं आणि त्यांचं यश पाहून येतो नाही का.....