लखनऊ : भारतीय राजकारणात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात सुरू झालेली यादवी. त्यातून गेलेली इज्जत आणि झालेला अपमान याचा बदला घेत मुलायमसिंह यादव अखिलेशला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनीचा हा गौप्यपस्फोट आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, राष्ट्रीय राजकारणातही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भारतातील समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलतान मुलायम सिंह यांनी हा गौप्यस्फोट केला. या कार्यक्रमात बोलताना मुलायमसिंह यांनी थेट नव्याने मांडणी करत नावा पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उपस्थित समूहाला संबोधित करताना प्रश्नार्थक वाक्य उच्चारत मुलायम म्हणाले, आता नवी सुरूवात करत नवा पक्ष काढण्याची वेळ आली आहे काय? उपस्थितांनी मुलायम यांच्या वक्तव्याला मोठा प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद नोंद करत मुलायम म्हणाले की, जिथे सन्मान नसतो तिथे राहणे कठीण असते. दरम्यान, मुलायम यांनी आपल्या कौटुंबिक वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, येत्या काळात मुलायम नवा पक्ष काढणार असा संदेश मात्र जरूर गेला आहे.
मुलायम सिंह यांनी जवळपास ३५ मिनिटे भाषण केलं. पण, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष असलेले आपले पुत्र अखिलेश यादव यांचा एकदाही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी आपले छोटे बंधू शिवपाल यादव यांचे मात्र जरूर कौतूक केले. भविष्यात जर कोणता मोठा निर्णय घेतला तर, त्यात शिवपाल सोबत असतील असेही मुलायम यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून समाजवादी पक्षात सुरू झालेला संघर्ष अद्यापही थांबला नसल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. तसेच, येत्या काळात मुलायम, शिवपाल विरूद्ध अखिलेश असा संघर्ष अधीक गडद होणार असल्याचेही चित्र आहे.