Cinema Halls in Kashmir: काश्मिरी जनतेसाठी एक आनंदाची बातमी. 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर काश्मीर खोऱ्यात सिनेमा परतत आहे. काश्मीरी जनतेला मनोरंजन मिळावं या उद्देशाने श्रीनंगर शहरात पहिलं मल्टिप्लेक्स सुरु होत आहे. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवादामुळे खोऱ्यातील सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते. त्यावेळी काश्मीरमध्ये सुमारे 15 सिनेमागृहे होती पण ती सर्व बंद झाली.
श्रीनगरमध्ये पहिलं मल्टिप्लेक्स
श्रीनगरच्या शिवपोरा भागात हे मल्टिप्लेक्स सुरु होणार असून यात तीन स्क्रीन आणि एकूण 5२० लोक बसण्याची क्षमता आहे. इमारतीची रचना आधुनिक मल्टिप्लेक्स इमारतीप्रमाणे करण्यात आली आहे. असं असलं तरी त्यात काश्मीरी कलाकृतीचा समावेश करण्यात आला आहे. इमारतीला पारंपारीक काश्मिरी 'खाटबंध' छत आणि काश्मीरी नक्षीकामाचा समावेश केला आहे. सप्टेंबर महिन्यात हे मल्टिप्लेक्स लोकांसाठी खुले केलं जाईल.
काश्मीरमध्ये सिनेमा परतला
विकास धर असं या मल्टिप्लेक्सच्या मालकाचं नाव आहे. काश्मिरमधल्या जनतेसाठी मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही. त्यामुळे गेली तीन-चार वर्ष आम्ही यावर विचार करत होतो, सिनेमाचं काश्मिरशी जूनं नातं आहे. अनेक सिनेमाचं शुटिंग काश्मीरमध्ये होतं, पण इथल्या जनतेला ते पहाता येत नाहीत, हाच विचार करुन मल्टिप्लेक्स सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं विकास धर यांनी सांगितलं.
या मल्टिप्लेक्समध्ये तीन स्क्रीन असून याची प्रेक्षक क्षमता 520 इतकी आहे. इतर शहरातील सिनेमागृहांप्रमाणे यामध्ये खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी उपलब्ध असणार आहेत.
मल्टिप्लेक्सची सुरक्षा हा मोठा प्रश्न
1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत काश्मीरमध्ये डझनभर सिनेमा हॉल होती, मात्र दहशतवाद वाढल्याने खोऱ्यातील सर्व सिनेमागृहे बंद झाली. 1999-2000 दरम्यान सरकारने काही सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर हल्ले झाले, त्यामुळे ते पुन्हा बंद झाले.
सर्वात जुन्या सिनेमा हॉलपैकी एक 'ब्रॉडवे' काही काळासाठी सुरु करण्यात आला. पण त्यानंतर तो कायमचा बंद झाला. सिनेमा हॉलसाठी सुरक्षा ही मुख्य चिंता आहे. पण मल्टिप्लेक्स मालक विकास धर यांनी कोणतीही भीती नसल्याचे सांगितलं. आपल्या निर्णयाला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे अशी माहिती त्यांनी दिली.