'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद

पाहा नेमकं कुठे आहे हे मंदिर .... 

Updated: Feb 18, 2020, 03:11 PM IST
'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोणत्याही मंदिरात गेलं असता, देवाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्या ठिकाणी देण्यात येणाऱा प्रसाद घेण्यासाठी सारेच रांगा लावतात. प्रसाद, म्हणजे गोडाचा एखादा पदार्थ, किंवा एखादं फळ फारफार तर खिचडी किंवा तसाच एखादा प्रकार. पण, तुम्ही कधी प्रसाद म्हणून मटण बिर्याणी खाल्ली आहे का? 

बसला ना तुम्हाला धक्का? तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात असणाऱ्या Muniyandi मुनियांडी या मंदिरात देवीला चक्क मटण बिर्याणीचा प्रसाद दाखवला जातो. दरवर्षी मदुराई येथे असणाऱ्या Vadakkam Patti वडक्कम पाटी या खेडेगावामध्ये Goddess Muniyandi या देवीचा फत्सव साजरा केला जातो. याच उत्सवादरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसाद म्हणून बिर्याणी दिली जात आहे. तेसुद्धा अगदी मोफत. 

१९७३मध्ये याची सुरुवात झाली. जेव्हा वडक्ककम पाटी या गावातील एकाने हॉटेलचा व्यवसाय सुरु केला आणि त्यांना यामध्ये कमालीचं यश मिळालं. याच यशप्राप्तीसाठी देवीचे आभार मानण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीने एका जंगी पंगतीचं आयोजन केलं होतं. रंजक गोष्ट म्हणजे या भागातील अनेकांनीच त्यापुढे हॉटेलचा व्यवसाय सुरु केला. इतकंच नव्हे तर, Goddess Muniyandi या देवीला ते मांसाहाराचाच नैवेद्य नित्यनियमाने दाखवू लागले. सध्याच्या घडीला दक्षिण भारतात Muniyandi नावाचे जवळपास ५०० हॉटेलं आहेत. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

देवावरील श्रद्दा आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक प्रथा म्हणून दरवर्षीच्या उत्सवामध्ये भाविकांना मटण बिर्याणी दिली जाते. गावातील बरेच हॉटेल मालक या उत्सवासाठी आर्थिक मदत करतात. विश्वास म्हणा, एखादी प्रथा किंवा मग देवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा अंदाज, तमिळनाडूतील या मंदिराची ही प्रथा खवैय्यांसाठी आणि अर्थातच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तितकीच लक्षवेधी आहे असं म्हणायला हरकत नाही.