Rajeev Chandrasekhar On Elon Musk: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे (Elon Musk) यांच्या व्यवसायामुळे आणि त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता ते त्यांच्या कुटुंबामुळेही चर्चेत आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांचा भारतासोबत खास संबंध असल्याचे समोर आलं आहे. एलॉन मस्क यांच्या एका मुलाचे नाव महान भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. खुद्द एलॉन मस्क यांनीही याबाबत भाष्य केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि ही मनोरंजक गोष्टही सांगितली. मस्क यांनी आपल्या मुलाचे नावही 'चंद्रशेखर' असल्याचे सांगितले आहे, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर ब्रिटनमध्ये आयोजित AI सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. तिथे त्यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली. मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की मस्क यांनी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रोफेसर एस. चंद्रशेखर यांच्या प्रभावाने त्यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असे ठेवले आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की जेव्हा ते एलॉन मस्क यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या मुलाचे नाव सांगितले. राजीव चंद्रशेखर यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट 'एक्स' वर (पूर्वीचे ट्वीटर) याबाबत पोस्ट करत माहिती दिली. एलॉन मस्क आणि शिवॉन गिलीस यांना यांच्या मुलाचे मधले नाव "चंद्रशेखर" आहे, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं. ब्रिटनच्या ब्लेचले पार्कमधील एआय सेफ्टी समिटमध्ये मी कोणाला भेटलो ते पहा. एलॉन मस्क यांनी सांगितले की शिवॉन गिलीज यांच्या मुलाचे मधले नाव 'चंद्रशेखर' आहे जे 1983 चे नोबेल भौतिकशास्त्रज्ञ प्रोफेसर एस चंद्रशेखर यांच्या नावावर आहे, असे ट्विट राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.
Look who i bumped into at #AISafetySummit at Bletchley Park, UK.@elonmusk shared that his son with @shivon has a middle name "Chandrasekhar" - named after 1983 Nobel physicist Prof S Chandrasekhar pic.twitter.com/S8v0rUcl8P
— Rajeev Chandrasekhar (@Rajeev_GoI) November 2, 2023
दुसरीकडे मुलाच्या नावाचा खुलासा करताना खुद्द शिवोन गिलीसनेही याला दुजोरा दिला आहे. राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटला उत्तर देताना शिवन जिलिस यांनी,"होय, हे खरे आहे. आम्ही त्याला शेखर म्हणतो, पण हे नाव अतुलनीय सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ निवडले गेले आहे," असे म्हटलं.
दरम्यान, 1-2 नोव्हेंबर रोजी ब्लेचले पार्क, बकिंघमशायर, ब्रिटन येथे दोन दिवसीय एआय सेफ्टी समिटचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यासह जगभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांची भेट टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याशी झाली. यावेळी राजीव चंद्रशेखर यांनी डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या आगामी GPAI आणि India AI समिटसाठी सर्व देशांना आमंत्रण दिले.