नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना अर्थशास्त्राची बिलकूल जाण नाही. आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही ते भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे सांगतात, अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते शनिवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना’या परिसंवादात बोलत होते.
स्वामी यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जाहीरपणे टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याशिवाय भाजप पक्षाचे अस्तित्व शून्य असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर स्वामी यांनी पुन्हा एकदा मोदी आणि जेटलींना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, असे मोदी आणि जेटली का सांगतात, तेच मला कळत नाही. ते जर विनिमय दराच्या आधारावर असे बोलत असतील तर हे आकडे सतत बदलत असतात. हाच निकष लावायचा झाल्यास सध्याच्या घडीला भारत सातव्या स्थानावर आहे.
'संघ म्हणजे पॉवर प्लांट, भाजप म्हणजे बल्ब, संघाशिवाय पक्षाचे अस्तित्व शून्य'
त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार मोजण्यासाठी क्रयशक्तीचा निकष ग्राह्य धरायला पाहिजे. त्यानुसार भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परकीय शक्तींच्या आक्रमणापूर्वी भारत व चीन जगातील सर्वात समृद्ध देश होते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये पुन्हा तसेच संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत, असेही स्वामी यांनी सांगितले.