श्रीनगर: अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे काश्मीर खोऱ्यात हिंसक निदर्शने होण्याची भीती आता फोल ठरताना दिसत आहे. कारण, संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या ईदच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बाजारांमध्ये स्थानिकांची लगबग दिसत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी नुकताच अनंतनाग येथील मेंढी बाजारात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी सुरक्षेचा आढावा घेताना स्थानिक मेंढपाळांशी गप्पा मारल्या. अनंतनागमधील या परिसरात दहशतवाद्यांचा मोठ्याप्रमाणावर वावर असतो. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ईदसाठी सध्या अनंतनागच्या मेंढी बाजारात मोठयाप्रमाणावर मेंढ्या आणल्या जात आहेत. यावेळी अजित डोवाल त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी बाजारात मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मेंढपाळाशी गप्पा मारल्या. मेंढ्यांची किंमत किती आहे, त्यांचे वजन किती आहे, या मेंढ्यांना काय खायला घालता, असे जुजबी प्रश्न त्यांनी मेंढपाळांना विचारले. यानंतर त्यांनी मेंढपाळांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या.
या स्थानिक मेंढपाळांना अजित डोवाल यांची ओळख पटली नाही. अजित डोवाल यांच्याशी गप्पा मारणाऱ्या एका मेंढपाळाने या मेंढ्या द्रासमधून आणल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर तुम्हाला द्रास माहिती आहे का, असा प्रश्नही विचारला. अखेर अनंतनागचे पोलीस उपायुक्त खालीद जनागीर यांनी मेंढपाळांना अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याचे सांगितले.
ANANTNAG: National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Anantnag, an area which has been a hotbed of terrorist activities in the past. #JammuAndKashmir pic.twitter.com/dUd7GPvS2W
— ANI (@ANI) August 10, 2019
ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल
काही दिवसांपूर्वी अजित डोवाल यांनी शोपिया जिल्ह्यातही नागरिकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरील लोकांशी संवाद साधला. यानंतर या लोकांनी आग्रह केल्यामुळे डोवाल यांनी त्यांच्यासोबत बिर्याणीचा आस्वाद घेतला होता.