भारतात 'या' राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला तर हजारोंच्या दंडासहीत होते कारावासाची शिक्षा

राष्ट्रीय प्रतीकांच्या वापरासंदर्भात महत्त्वाचे कायदे आणि नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे सर्वसामान्यांना पालन करणे भाग आहे. तुम्हाला माहिती आहे का? जर या प्रतीकांचा गैरवापर केला तर काय कारवाई केली जाते, आत्ताच या विषयी सविस्तर जाणून घ्या. 

Updated: Jan 29, 2025, 03:51 PM IST
 भारतात 'या' राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला तर हजारोंच्या दंडासहीत होते कारावासाची शिक्षा  title=

National symbols: आपण अनेकदा पाहतो की काही लोक त्यांच्या गाड्यांवर राष्ट्रीय ध्वज किंवा अशोक स्तंभ लावतात. परंतु, हे करणे कायद्यानुसार चुकीचे आहे. भारतात राष्ट्रीय प्रतीकांसाठी विशिष्ट कायदे आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा मनाप्रमाणे वापर करण्याची परवानगी नाही.

राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

भारतीय ध्वज संहिता, 2002 नुसार, कोणताही भारतीय नागरिक आपल्या घरावर, कार्यालयात किंवा कारखान्यात तिरंगा फडकवू शकतो. मात्र, त्यासाठी काही नियम पाळावे लागतात. तिरंग्याचा उपयोग कपडे, सजावट किंवा काही गोष्टी झाकण्यासाठी करू शकत नाही. ध्वज जमिनीला, पाण्याला किंवा फर्शीला स्पर्श करू नये. कोणत्याही कार्यक्रमात व्यासपीठ किंवा टेबल झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल, तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असावी.

कारमध्ये तिरंगा लावण्यास मनाई

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या गाड्यांवर तिरंगा लावण्याची परवानगी नाही. भारतीय ध्वज संहितेनुसार, काही विशेष पदाधिकार्‍यांनाच त्यांच्या कारवर तिरंगा लावण्याचा विशेषाधिकार आहे.

या व्यक्तींनाच आहे अधिकार
1. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती
2. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल
3. लोकसभा आणि राज्यसभेचे सभापती व उपसभापती
4. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
5. मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री

तिरंग्याचा गैरवापर केल्यास काय शिक्षा होऊ शकते?

राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, 1971 नुसार, जर कोणी तिरंग्याचा अवमान केला किंवा गाडीवर बेकायदेशीरपणे लावला, तर त्या व्यक्तीला 3 वर्षांचा कारावास किंवा दंडाची शिक्षा होते. गंभीर विषय असल्यास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

अशोक स्तंभ आणि इतर राष्ट्रीय प्रतीकांचा वापर

भारतीय राष्ट्रीय प्रतीकांमध्ये अशोक स्तंभाचा समावेश होतो. त्याचा वापर केवळ घटनेनुसार नियुक्त असलेल्या व्यक्तींनाच करता येतो, जसे की: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्याशिवाय केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि इतर अधिकारी करू शकतात.

राष्ट्रीय प्रतीकांचा चुकीचा वापर केल्यास काय होऊ शकते?

भारतीय राष्ट्रीय चिन्ह अधिनियम, 2005 नुसार, कोणीही आपल्या मनाने अशोक स्तंभ किंवा इतर राष्ट्रीय चिन्हे वापरू शकत नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 2 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ₹5000 पर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कायद्यांचे पालन करून आणि अयोग्य वापर टाळून आपण आपल्या राष्ट्रध्वज आणि प्रतीकांचा योग्य सन्मान राखू शकतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x