या आधी भाजपशी जुळवून घेणारा तो राष्ट्रवादीचा आमदार फुटला

गोव्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Updated: Dec 14, 2021, 07:43 PM IST
या आधी भाजपशी जुळवून घेणारा तो राष्ट्रवादीचा आमदार फुटला title=

गोवा : गोव्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे. चर्चिल यांनी पक्ष सोडल्याने त्यांनी गोव्यात राष्ट्रवादी पक्ष हा तृणमुलमध्ये विलीन केला आहे.

चर्चिल यांनी आपणास तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे परवानगी मागितली आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायची. मात्र मागच्या दोन टर्ममध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेपासून दूर होता. 

मात्र बाणावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी मधल्या काळात भाजपाशी जुळवून घेतल्यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने चर्चिल आलेमाव यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. 

त्यातच आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव या २०२२ला  बाणवली आणि न्हवेलीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने मागच्या वर्षभरापासून दूर ठेवल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूलमध्ये विलीन करून आगामी विधानसभा निवडणूक तृणमूलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.