NEET पेपर लीक करणारे हेच ते बाप-लेक! 'येथून' देशभर चालवत होते रॅकेट

NEET 2024: नीट परीक्षांचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच तापला आहे. या प्रकरणी बिहार येथेही नीटचे पेपर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 12:43 PM IST
NEET पेपर लीक करणारे हेच ते बाप-लेक! 'येथून' देशभर चालवत होते रॅकेट title=
NEET Paper Leak in Bihar father son duo mastermind behind bihar paper leak

NEET 2024: देशभरात सध्या नीट परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात MBBS आणि BDS साठी प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा  (NEET-UG 2024) बाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. बिहारमध्ये परीक्षेच्या आधीच नीटचा पेपर लीक झाल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकरणात बाप-मुलाची जोडी मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या नालंदामध्ये बसून हे बाप-लेक संपूर्ण देशभरातील पेपर लीक करण्याचे नेटवर्क चालवत होते. पोलिसांनी या दोघांचाही शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारी बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOU) आज (मंगळवार, 18 जून) बिहार पोलिसांना छाप्यादरम्यान सापडलेल्या अर्ध्या जळालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जुळवणार आहे. यासाठी EOU टीम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या कार्यालयात जाऊन परीक्षेचे मूळ पेपर गोळा करणार आहे.

बिहारच्या नालंदा येथील संजीव मुखिया आणि त्यांचा मुलगा शिव हे बिहार पेपर लीक प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. हे दोघं संपूर्ण देशात पेपर लीक करत होते. नीट पेपर लीक प्रकरणाच्या आधीही वेगवेगळ्या राज्यातील सरकारी भरती आणि परीक्षांच्या घोटाळ्यांध्ये या दोघांचे नाव आले होते. संजीव मुखिया आणि त्यांचा मुलगा शिव यांचे संपूर्ण देशात नेटवर्क आहे. देशात कोणत्याही परीक्षांचा पेपर लीक झाला तर त्यामध्ये संजीव आणि त्यांच्या मुलाचे नाव समोर येतेच. 

NEETचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेले पेपरची पडताळणी करण्यासाठी आज EOU NTAच्या कार्यालयात जाण्याच्या तयारीत आहे. NTAकडून अद्याप बिहार पोलिसांच्या  EOUला कोणतेही सहकार्य करण्यात आले नव्हते. NTA ने EOU च्या मूळ परीक्षेचे पेपर जुळण्यासाठी पडताळणी करण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नव्हता. EOU ची दोन सदस्यीय टीम प्रथम दिल्लीतील NTA च्या मुख्यालयात जाईल आणि परीक्षेचे मूळ पेपरबाबत विचारणा करेल. या परीक्षेचा पेपर अर्धवट जळालेल्या पेपरसोबत जुळवण्यात येणार आहे. त्यानंतर ईओयू मूळ परीक्षेच्या पेपरची प्रत घेऊन पटनाला परत येईल. यामुळं तपासाला दिशा येणार आहे. जर NTA अधिकारी EOU टीमला सहकार्य करत नसतील तर न्यायालयाकडून आदेश दिल्यानंतर NTA कडून परीक्षेचा मूळ पेपर घेतला जाईल.

NEET पेपर लीक प्रकरणात बिहार पोलिसांनी आत्तापर्यंत १३ विद्यार्थ्यांना आरोपी बनवले होते, त्यापैकी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 9 जणांना ईओयूने आज पटना येथे चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 9 पैकी 5 मुली आहेत, ज्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले आहे. यापैकी 7 बिहारमधील, तर 1 उत्तर प्रदेश आणि 1 महाराष्ट्रातील आहे.

दरम्यान, पाटणा EOU ला 6 पोस्ट-डेटेड चेक सापडले आहेत, जे पेपर लीक माफियांच्या बाजूने जारी करण्यात आले आहेत. डीआयजी (EOU) मानवजीत सिंह ढिल्लन यांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेले चेक परीक्षेचा  आरोपींच्या नावे जारी करण्यात आला आहे. माफियांनी प्रत्येक उमेदवाराकडे प्रत्येकी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. तपास अधिकारी आता संबंधित बँकेकडून या चेकवर दिलेल्या खातेदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 NTA ने 5 मे रोजी 571 शहरांमधील 4,750 परीक्षा केंद्रांवर NEET-UG 2024 परीक्षेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये 24 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. बिहारमध्ये परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. नऊ उमेदवारांना एका दिवसापूर्वी पाटण्याजवळील 'सेफ हाऊस'मध्ये बोलावून परीक्षेचे पेपर आणि त्यांची उत्तरे देण्यात आली होती, बिहार पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.