Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ   

अरूण म्हेत्रे | Updated: Jun 7, 2024, 10:32 AM IST
Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण? title=
Neet UG Results 2024 Controversy 67 students scoring Top Rank Aspirants Demand Re Exam Latest News

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Neet UG Results 2024 Controversy) देशात सध्या निकालांचं सत्र सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं दहावी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्सुकता लागलेली ती म्हणजे (Loksabha Election Results 2024) लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. 4 जून रोजी देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्याच दिवशी आणखी एका महत्त्वाच्या परीक्षेचेही निकाल समोर आले. एकिकडे लोकशाहीची परीक्षा निकाली निघालेली असतानाच दुसरीकडे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकालही जाहीर झाला. 

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या आणि लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं मात्र एकच खळबळ माजली आहे. निकालाची एकंदर टक्केवारी पाहता यंदाच्या तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे, त्यामुळे या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून, आता या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

(NEET Exam) नीट परीक्षांच्या मार्गदर्शकांच्या म्हणण्यानुसार हरियाणा, राजस्थान, कर्नाटक या आणि अशा केंद्रांवरील जवळपास 10- 15 च्या फरकानं विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले आहेत. एका केंद्रामध्य़े किंवा त्या आजुबाजूच्या केंद्रांमध्ये असणारी ही मुलं 720 पैकी 720 गुण मिळवू शकतात, असं होणं शक्यंय? हा प्रश्न हरीश बुटले यांनी उपस्थित केला. पेपर लिक झाल्याशिवाय असा प्रकार घडतो का? हा थेट सवाल त्यांनी झी 24तासशी संवाद साधताना मांडला. 

हेसुद्धा वाचा : Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

काही मुलांना तो पेपर उशिरानं देण्यात आल्याचे प्रकारही काही केंद्रांवर घडले आणि हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. यावर्षी मुलांना 718, 719 असे गुण मिळाले आणि असं प्रत्यक्षात शक्य नाही, कारण एका प्रश्नाला चार गुण असतात. त्यामुळं एक प्रश्न चुकला तरी ते चार गुण आणि त्यासाठीचा निगेटीव्ह मार्किंगचा एक गुण मिळून पाच गुण कमी होतात. म्हणजे गुण 715 वर येणं अपेक्षित असतं, अनेकदा त्याहीपेक्षा गुण मिळू शकतात. जर एखाद्या विद्यार्थ्यानं उत्तर येत नसल्यास तो प्रश्न रिक्त सोडल्यास त्याचे चार गुण कमी होऊन विद्यार्थ्याला 716 गुण मिळती. पण, हे 718, 719 गुण आले कुठून? बरं, विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला म्हणून त्यांना असे गुण मिळाले हे स्पष्टीकरणही कोणत्या आधारावर केलं जातं? असा प्रश्न करत हा वास्तवदर्शी मुद्दही हरीश बुटले यांनी अधोरेखित केला. 

नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात घोटाळा झाल्याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार शरद पवार यांनीसुद्धा उपस्थिती केला. x या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून त्यांनी एक पोस्ट करत यंत्रणांचं लक्ष वेधलं. 

घोटाळ्यांचे लोन NEET परिक्षेपर्यंत

'आज #पेपरफुटी आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचे लोन #NEET परिक्षेपर्यंत पोहचले असून #NTA सारख्या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही पारदर्शकपणे पार पडणार नसतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा? काही कोटींच्या मलिद्यासाठी युवांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभतं का? घोटाळे करून परीक्षा होणार असतील आणि सरकार मलिदा देणाऱ्यांना पास करणार असेल तर सर्वसामान्यांनी स्वप्नं बघायची की नाही?

इलेक्टोरल बाँडमधून ८ हजार कोटी रुपयांचा मलिदा खाल्ल्यानंतरही भाजपप्रणित केंद्र सरकारची भूक अद्याप शमलेली दिसत नाही. त्यामुळंच महाराष्ट्रात ज्याप्रमाणे #normalisatioan च्या नावाखाली घोळ करून राज्य सरकारने हजारो कोटी रुपये उकळले त्याच धर्तीवर #ग्रेस देण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने नीट परीक्षेतही अफरातफर केली आहे.

युवांचा भवितव्याशी खेळणाऱ्या या सरकाराला आता ‘नीट’ रुळावर आणण्याची गरज आहे. इंडिया आघाडीला पहिले कुठले काम करायचे असेल तर #neet परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात सरकारची धुलाई करून देशातील युवांना न्याय देण्याचं काम करावं.' असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. तेव्हा आता संबंधित यंत्रणा यासंदर्भात कोणता निर्णय घेणार आणि विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.