New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक  

सायली पाटील | Updated: Jan 1, 2024, 08:46 AM IST
New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल title=
New Year 2024 garbage near atal tunnel himachal pradesh news

New Year 2024 Himachal Pradesh : हिवाळा सुरु झाला की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांमध्ये वळतात. हिमाचल प्रदेश असो किंवा मग जम्मू काश्मीर. प्रत्येक वर्षी पर्यटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी करत या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात पण, या साऱ्यामध्ये बरेच पर्यटक त्यांच्या जबाबदाऱ्याही मात्र विसरतात. सध्या हिमाचल प्रदेशात याचीच प्रचिती देणारं आणि विचार करायला भाग पाडणारं दृश्य पाहायला मिळालं. जे पाहून तुमचाही संताप अनावर होईल. 

हिमाचल प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांसाठी अटल टनल हा बोगदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मूळ हिमाचलला लाहौलशी जोडणाऱ्या या बोगद्यामुळं राज्याचील दुर्गम भागात पोहोचण्याची वाट आणखी सुकर झाली आहे. त्यामुळं वर्षातील सर्वच दिवस या बोगद्यातून असंख्य वाहनांची ये-जा सुरु असते. पण, या प्रवासाचा आनंद घेणारी मंडळीच आता या परिसाच्या सौंदर्यात मीठाचा खडा टाकताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एक फोटो पाहून याचाच अंदाज येत आहे. भारतीय वन विभागात काम करणाऱ्या आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी X च्या माध्यमातून एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये फक्त कचऱ्याचा ढीगच पाहायला मिळत आहे. फोटोच्या एका कोपऱ्यात मागे बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहायला मिळत आहेत. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra weather updates : नव्या वर्षात हवामानाचे नवे तालरंग; राज्याच्या 'या' भागात पावसाची शक्यता 

हा फोटो शेअर करत त्या अधिकाऱ्यानं तिनं लिहिलं, 'आपण या पर्वतांवर काय सोडून जातोय? हे सिस्सू गाव आहे. अटल टनल ओलांडल्यानंतर लागणारी दोन गावं म्हणजे सिस्सू आणि कोकसार. अटल टनलमधून दर दिवशी हजारो वाहनं प्रवास करतात. पण, इथून परतत असताना आपण केलेला कचरा परत नेणं ही इथं येणाऱ्यांची जबाबदारी नाही का?'

हिमाचलमधील मन विचलित करणारं हे दृश्य शेअर करत असताना त्यांनी 'हिलिंग हिमालय' नावाच्या एका अकाऊंटलाही टॅग केलं. ही संस्था हिमालय क्षेत्रामध्ये असणाऱ्या पर्यटनस्थळी येणाऱ्यांकडून केला जाणारा कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचं काम करते. 

कोण आहेत परवीन कासवान ? 

परवीन कासवान हे एक आयएफएस अधिकारी असून ते निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टींबाबत ते जागरुकता पसरवण्याचं काम करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून हिमाचलमधील चिंताजनक परिस्थिती सर्वांसमोर आणली.