पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या कारचा मालक सापडला; 'एनआयए'ला तपासात मोठे यश

शक्तिशाली स्फोटामुळे दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाडीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या.

Updated: Feb 25, 2019, 08:04 PM IST
पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या कारचा मालक सापडला; 'एनआयए'ला तपासात मोठे यश title=

नवी दिल्ली: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती एक महत्त्वपूर्ण दुवा लागला आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या कारचा मालक सापडला आहे. सज्जाद भट असे त्याचे नाव असून तो देखील जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आहे. या हल्ल्यानंतर 'एनआयए'ने घटनास्थळी येऊन पुरावे गोळे केले होते. यानंतर न्यायवैद्यक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या तपासात पुलवामा स्फोटासाठी मारुती एको ही गाडी वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गाडी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे राहणाऱ्या सज्जाद भट याच्या मालकीची होती. 'एनआयए'च्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भट फरार झाला आहे. त्याने ४ फेब्रुवारी २०१९ ला हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली गाडी विकत घेतली होती. 

सज्जाद हा शोपियान येथील सिराज-उल-उलूमचा विद्यार्थी होता. २३ फेब्रुवारीला एनआयए आणि स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला होता. मात्र, त्यावेळी सज्जाद घरात नव्हता. या हल्यानंतर तो जैश-ए-मोहम्मद संघटनेत सामील झाल्याचे समजते. सोशल मीडियावर हातात शस्त्र घेतलेले सज्जादचे छायाचित्रही व्हायरल होत आहे. 

शक्तिशाली स्फोटामुळे दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाडीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या. मात्र, तरीदेखली 'एनआयए'च्या पथकातील न्यायवैद्यक आणि ऑटोमोबाईल तज्ज्ञांनी मारुती एको गाडीचा चेसिस आणि इंजिन क्रमांक शोधून काढला. यावरून सज्जादचा माग काढण्यात यश मिळाले. एनआयएने  ही गाडी सर्वप्रथम अनंतनाग येथील मोहम्मद जलील अहमद हक्कानी याने विकत घेतली होती. यानंतर सातवेळी ही गाडी विकण्यात आली व अखेर सज्जादच्या ताब्यात मिळाली. याच गाडीचा वापर पुलवामा हल्ल्यासाठी करण्यात आला.

१४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील गाडीवर नेऊन आदळले होते. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते.