फाशीची सुनावणी ७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती

Updated: Dec 18, 2019, 04:18 PM IST
फाशीची सुनावणी ७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर  title=

नवी दिल्ली : देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मारेकरी अक्षय ठाकूर याची पुनर्विचार याचिका रद्द केलीय. त्यानंतर पटियाला हाऊस कोर्टात दोषींना लवकरात लवकर फासावर लटकावण्यासंबंधी याचिकेवर सुनावणी सुरू झाली. कोर्टात निर्भयाच्या वकिलांनी दोषींना लवकर डेथ वॉरंट जारी करून त्यांना फासावर लटकावण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला जावा, अशी मागणी केली. पटियाला हाऊस कोर्टाकडे दोषींची पुनर्विचार याचिका रद्द झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. परंतु, पटियाला हाऊस कोर्टात आज या प्रकरणाची सुनावणी टळलीय. आता या प्रकरणावर येत्या ७ जानेवारी २०२० रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

यावेळी पटियाला हाऊस कोर्टानं बुधवारी तिहार तुरुंग प्रशासनालाही निर्देश दिलेत. निर्भयाच्या दोषींना दया याचिका दाखल करण्यासाठी एका आठवड्याची नोटीस जारी करण्याचे निर्देश पटियाला हाऊस कोर्टानं दिलेत. 

(अधिक वाचा : निर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली)

सुनावणी टळल्यानं कोर्टात हजर असणाऱ्या आणि आपल्या मुलीला न्याय कधी मिळणार? हा प्रश्न विचारणाऱ्या निर्भयाच्या आईला आपले अश्रू आवरणं कठिण झालं. निर्भयाचे आई-़वडिल कोर्टाच्या जवळपास प्रत्येक सुनावणीला हजर असलेले दिसतात. १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून हे माता-पिता आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी अक्षयनं केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय. त्यामुळे अक्षयची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. इतर तीन दोषींची फेरविचार याचिका आधीच फेटाळण्यात आलीय. त्यामुळे आता चारही दोषींची फाशी आता कायम राहणार आहे. आता दोषींकडे सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्याचा किंवा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. पण राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळावी, अशी शिफारस याआधीच गृहमंत्रालयानं केलीय.