अवघ्या ५ पैशात मिळणार समुद्राचे पिण्यायोग्य पाणी - गडकरी

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठीचा प्रकल्प तामिळनाडूतील तूतीकोरीन येथे सुरू असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 17, 2018, 04:31 PM IST
अवघ्या ५ पैशात मिळणार समुद्राचे पिण्यायोग्य पाणी - गडकरी title=

भोपाळ : केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची भविष्यवाणी आणि सरकारी प्रयत्न जर यशस्वी झाले तर, तुमची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. गडकरी यांनी म्हटले आहे की, भविष्यात समुद्राचे पाणी हे पिण्यायोग्य केले जाईल. इतकेच नव्हे तर, हे पाणी अवघ्या ५ पैसे प्रती लिटर इतक्या कमी पैशात उपलब्ध होईल. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठीचा प्रकल्प तामिळनाडूतील तूतीकोरीन येथे सुरू असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

दोन दिवसीय नदी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी शुक्रवारी बोलत होते. गडकरी म्हणाले, हे फार दुर्दैवी आहे की, देशातील काही राज्ये ही पाणीवाटपावरून आपसांत भांडत आहेत. देशात नद्यांच्या पाण्यावरून संघर्ष केला जात आहे. मात्र, भारतातून जे पाणी पाकिस्तानात जात आहे, त्याबाबत मात्र कोणालाच चिंता वाटत नाही. भारतातून ६ नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते.

दरम्यान, इस्रायलमध्ये समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते तेव्हा, भारतातही असा प्रयोग राबविण्याबाबत चर्चा झाली होती.